जळगाव वसतीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत खडाजंगी, चार सदस्यीय चौकशी समिती गठीत
श्वेता महाले यांनी मागणी केल्यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेतो असे त्रोटक उत्तर दिले. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत हे योग्य नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा थेट इशारा दिला.
![जळगाव वसतीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत खडाजंगी, चार सदस्यीय चौकशी समिती गठीत Jalgaon hostel women atrocities case, four member inquiry committee formed जळगाव वसतीगृह महिला अत्याचार प्रकरणी विधानसभेत खडाजंगी, चार सदस्यीय चौकशी समिती गठीत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/03/03182030/Anil-Deshmukh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकाराचे पडसाद विधीमंडळात उमटले. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. तरुणींना कपडे काढून डान्स करायला लावलं गेले. त्याचा व्हिडीओ बनवला गेला. या गंभीर प्रकाराबद्दल दोषींवर कारवाई झाली पाहिजे. गृहमंत्र्यांना विनंती आहे की या पोलिसांचं निलंबन करावे, अशी मागणी श्वेता महाले यांनी केली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही घटनेची गंभीर दखल घेत दोषींवर नियमाने कारवाई होईल असं आश्वासन दिलं आहे.
जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होणार आहे. त्यानंतर नियामानुसार दोषींवर कारवाई होईल, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत सांगितलं.
सुधीर मुनगंटीवार आक्रमक
श्वेता महाले यांनी मागणी केल्यावर गृहमंत्र्यांनी नोंद घेतो असे त्रोटक उत्तर दिले. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्रमक भूमिका घेत हे योग्य नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावावी लागेल, असा थेट इशारा दिला. आई बहिणी सुरक्षित नाही, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली. त्यावर नवाब मलिक यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देऊ नका हे वाक्य रेकॉर्डवरून काढा अशी मागणी केली.
काय आहे प्रकरण?
जळगावच्या आशादीप वसतीगृहातील महिला आणि मुलींना काही जणांनी डान्स करायला लावल्याचा प्रकार समोर आला होता. या महिलांनी घडलेल्या प्रकाराची शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांकडे तक्रार केल्याने ही संपूर्ण घटना उघडकीस आली. या महिलांनी आपल्यावर अन्याय, अत्याचार केला जात असल्याची तक्रार केली आहे. यामध्ये रात्री काही तरुण पैसे घेऊन या ठिकाणी प्रवेश करून अनैतिक कृत्य करत असल्याचं म्हटलं आहे. इंदूबाई बहुउद्देशीय संघटनेच्या अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्या मंगला सोनवणे आणि जनायक फाउंडेशनचे फिरोज पिंजारी यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देऊन योग्य ती कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घटनेचा संदर्भात आपल्याकडे काही जणांनी निवेदन दिले आहे. त्यानुसार आपण चौकशी समिती गठीत केली असून ही चौकशी समिती संपूर्ण घटनेचा तपास करून अहवाल देणार आहे. या अहवालानुसार कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारची प्रतिक्रिया जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
आशादीप वसतिगृह काय आहे?
जळगावातील ‘आशादीप महिला शासकीय वसतिगृह’ ही संस्था विधवा, कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या तसेच कुमारी माता, मुली, अनाथ मुलं यांना आधार देते. त्यांच्या फक्त समस्या सोडवण्यापुरते हे मर्यादित नसून अनेक मुलींचे संसार याद्वारे थाटले गेले आहेत. 1983 मध्ये या वसतिगृहाची स्थापना शहरात करण्यात आली. तर 2006 पासून यास आश्रयगृह म्हणून घोषित करण्यात आले. आज येथील महिला व मुली स्वबळावर उभ्या राहण्याचे प्रशिक्षण घेत असून यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)