कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत राडा
एका विषयावरून शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे आणि सभापती राहुल दामले यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर रमेश म्हात्रे हे सभापती राहुल दामले यांच्या अंगावर धावून गेले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आज झालेल्या स्थायी समिती सभेत हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे हे सभापती राहुल दामले यांच्या अंगावर धावून गेले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समिती सभेत सुरुवातीपासून रमेश म्हात्रे हे आक्रमक भूमिकेत होते. त्यातच डोंबिवलीच्या एका विषयावरून त्यांच्यात आणि सभापती राहुल दामले यांच्यात शाब्दिक चकमक झाली. दामले हे निष्क्रिय महापालिका अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप रमेश म्हात्रे यांनी केला.
रमेश म्हात्रे यांच्या आरोपानंतर या दोघांमध्ये खडाजंगी झाली. त्यानंतर रमेश म्हात्रे यांनी दामले यांना एकेरी उद्धार करत थेट त्यांच्या अंगावर धावून गेले. सभेची विषयपत्रिकाही म्हात्रे यांनी दामलेंच्या अंगावर भिरकावली. या गोंधळानंतर दामले यांनी तातडीने सभा तहकूब केली.
याप्रकरणी दामले यांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात रमेश म्हात्रे यांची लेखी तक्रार केली आहे. तर रमेश म्हात्रे हे मात्र आपल्या भूमिकेवर ठाम असून अधिकारी वर्गामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये वाद होत असल्याचं ते म्हणालेत.
























