Rain UPDATES | पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Rain UPDATE | मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे.

Background
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. हवामान विभागाने मुंबई परिसरात 3 आणि 5 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट जारी केला आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस अद्यापही कायम आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.
तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरु आहे.
तर कोल्हापुरातही जोरदार पाऊस कायम आहे. पंचगंगा नदीने यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पात्र सोडलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पावसाचा धुमाकूळ सुर असून धरणक्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे.























