बियाणांमध्ये दोष आढळल्यास महाबिजवरही कारवाई करू, कृषिमंत्री दादा भुसे आक्रमक
एकीकडे कोरोनाचं संकंट असताना शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे. तसेच युरिया खतावर लिंकिंग करणाऱ्यांवर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यांचे कृषिमंत्री दादा भुसे अॅक्शन मोडमध्ये आहेत. कधी ते वेश बदलून खतांच्या दुकानात जातात तर कधी ते सदोष बियाणं प्रकरणी कारवाईची भाषा करतात. गेल्या अनेक दिवसांपासून खतं आणि बियाणांसंदर्भात तक्रारी वाढत असून दोषी लोकांवर तातडीनं कारवाई करण्याचं आश्वासन कृषिमंत्री दादा भुसे यांनी एबीपी माझाची बोलताना दिलं आहे. एकीकडे कोरोनाचं संकंट असताना शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीमुळे कृषिमंत्री दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलच धारेवर धरलं आहे.
शेतकऱ्यांना तात्काळ पीक कर्ज पुरवठा झाला पाहिजे यासाठी दादा भुसे काम करत आहेत. तसेच युरिया खतावर लिंकिंग करणाऱ्यांवर कृषी विभागाने लक्ष ठेवण्याचे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत. गावात किंवा तालुक्यात युरियावर लिंकिंग करणारा विक्रेता सापडला तर संबंधीत दुकानासह कृषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी आक्रमक भूमिका दादा भुसे यांनी घेतली आहे.
कृषिमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?
सोयाबीन बियाणे बोगस असल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी केल्या आहेत. याची पाहणी मी सुद्धा शेतात जाऊन केली होती. कृषी विद्यापीठ परभणीचे सोयाबीनचं संशोधन करणारे शास्त्रज्ञ आणि कृषी विभागाचे अधिकारी यांची समिती चौकशीसाठी नेमली आहे. महाबीजचे बियाणे उगवले नसेल तर शेतकर्यांना तातडीने नवं बियाणं दिले जाईल. इतर बियाणांबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर शेतकर्यांना नुकसान भरपाई दिली जाईल आणि कंपन्यांवर कारवाई देखील केली जाईल, असं आश्वासन दादा भुसे यांनी दिलं आहे.
खतांच्या बाबतीत काय घडलं होतं?
कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकरी बनून रविवारी औरंगाबादमधील कृषी उत्पन्न बाजार समितीत जाऊन खत मागितलं. पण खताचा साठा असतानाही नवभारत फर्टिलायझर्स या कृषी सेवा केंद्रानं नकार दिला. त्यानंतर दादा भुसे यांनी स्वत:ची खरी ओळख सांगितल्यानंतर या सेवा केंद्रातील कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली. खरीप हंगामात बियाणं आणि खतांची अवाजवी भावात विक्री होत असल्याच्या तक्रारी कृषिमंत्र्यांकडे आल्या होत्या. त्यानंतर कृषिमंत्री दादा भुसे यांनी स्वत: कृषी सेवा केंद्रात जाऊन स्टिंग ऑपरेशन केलं. त्यामुळे दादा भुसे चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि कारवाईची भाषा ते करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
