ठाण्यात हॉस्पिटल टेंडर घोटाळा? मनसेकडून गंभीर आरोप करत चौकशीची मागणी
ओम साई आरोग्य केअर ही कंपनी पूर्णपणे बदनाम झालेली कंपनी आहे. त्यांच्या बाबत मुंबई तसेच इतरत्र असंख्य तक्रारी दाखल आहेत. तरीही दुप्पट भावाने निविदा भरलेल्या या कंपनीला कंत्राट देण्यात आलं.
ठाणे : नवीन कोपरी पुलास तडे गेल्याचे प्रकरण उघडकीस आणल्यानंतर ठाण्यातील मनसेने पालिकेचा टेंडर घोटाळ्यातील भ्रष्टाचार उघडकीस आणण्याचा दावा केला आहे. ठाणे महानगरपालिकेने कोरोना हॉस्पिटल चालवण्याचे कंत्राट सर्वात कमी भाव असलेल्या कंपनीला न देता, दुप्पट भावाने निविदा भरलेल्या कंपनीला दिल्याचा दावा मनसे ठाणे अध्यक्ष अविनाश जाधव यांनी केला आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख आणि ठाण्यातील शिवसेनेच्या एका बड्या नेत्याचा दबाव असल्याचा गंभीर आरोप देखील जाधव यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी आज ठाणे पालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांची भेट घेऊन या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
सद्य परिस्थितीला ठाणे महानगरपालिकेची दोन मोठी कॉविड हॉस्पिटल्स कार्यरत आहेत. गेल्यावर्षी सुरू झालेले हजार खाटांचे ग्लोबल कोविड हॉस्पिटल आणि 1200 खाटांचे पार्किंग प्लाझा हॉस्पिटल ही दोन्ही हॉस्पिटल चालवण्याचे कंत्राट ओम साई आरोग्य केअर लिमिटेड या कंपनीकडे आहे. तसेच इतर हॉस्पिटल्स जे अजून सुरू झाले नाहीत, त्यांचे कंत्राट देखील या कंपनीला देण्यात आले आहे. ज्यावेळी या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनासाठी निविदा काढण्यात आल्या त्यावेळी तीन निविदाकारांनी टेंडर भरले. सर्वात कमी ऑल इन सर्व्हिसेस या कंपनीने 2300 या दराने टेंडर भरले. तर ओम साई प्रा,लि. कंपनीने हे टेंडर 4400 या दराने भरले. त्यामुळे ऑल इन सर्व्हिसेस या कंपनीला काम देण्यात आले. मात्र त्यांना या दराने काम न करता जास्त दराने काम करण्यास दबाव टाकण्यात आला होता असा आरोप जाधव यांनी केला आहे. या कंपनीने असे करण्यास नकार दिल्यावर त्यांच्यावर जाचक अटी लादून त्यांचे कंत्राट रद्द करण्यात आले. त्यानंतर वाटाघाटी करून ओम साई प्रा.लि कंपनीला देखील यामध्ये समावेश करून घेतल्यानंतर दोन्ही कंपन्यांच्या स्टाफमध्ये खटके उडायला सुरुवात झाल्यानंतर हा घोटाळा समोर आला असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.
ओम साई आरोग्य केअर ही कंपनी पूर्णपणे बदनाम झालेली कंपनी आहे. त्यांच्या बाबत मुंबई तसेच इतरत्र असंख्य तक्रारी दाखल आहेत. व्हेंटिलेटर बेडसाठी पैसे घेणे, जिवंत माणसाला मृत दाखवणे, अभिनेत्रींना लस घेण्यासाठी फेक आयकार्ड देणे असे अनेक घोटाळे या कंपनीने केलेले आहेत. असे असताना त्याच कंपनीला हे टेंडर दिले जाते याचा अर्थ सरळ आहे की, करदात्या नागरिकांच्या पैशांची, परिस्थिती कितीही भयानक असली तरी लूट करायचीच हीच एकमेव मानसिकता प्रशासनाची असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण टेंडर घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे अविनाश जाधव यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान या आरोपांसदर्भात ठाणे महानगर पालिकेच्या प्रशासनाला आम्ही वारंवार प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला, मात्र त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे पालिका या संदर्भात काय प्रतिक्रिया देते आणि मागणी झाल्याप्रमाणे चौकशी होईल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.