(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अजित डोवाल यांना भेटल्यावर मर्कजचे मौलाना कुठे पळाले, गृहमंत्री अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल
दिल्लीतील निजामुद्दीन येथे पार पडलेल्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रावर गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : दिल्लीतील निजामुद्दीन येथील तब्लिगी जमातच्या मर्कज कार्यक्रमावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्रात होणाऱ्या तब्लिगी जमातच्या कार्यक्रमाला आम्ही परवानगी दिली नाही. मात्र, निजामुद्दीन पोलीस स्टेशनच्या शेजारी झालेल्या या कार्यक्रमाला का थांबवलं नाही? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तब्लिगी जमातचे मौलाना यांना का भेटले? त्यानंतर मौलाना कुठे गायब झाले? अशावेळी दिल्ली पोलीस आयुक्त काय करत होते? असे गंभीर प्रश्न अनिल देशमुख यांनी केंद्राला विचारले आहे.
नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे तब्लिगी जमातचा मर्कज कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमामुळे देशातील अनेक राज्यात कोरोनाचा प्रसार झालाय. यावरुन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राला काही प्रश्न केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विरोधी पक्ष नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत : सूत्र
काय आहेत अनिल देशमुख यांचे प्रश्न
- मुंबईच्या उपनगर वसई येथे 15 आणि 16 मार्चला 50 हजार तब्लिगी जमणार होते. त्या आयोजनाला महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने परवानगी नाकारुन रोखलं.
- केंद्रात गृहमंत्रालयाने निजामुद्दीन, दिल्लीमध्ये तब्लिगी मर्कजच्या कार्यक्रमाला परवानगी का दिली.?
- निजामुद्दीनच्या शेजारीच निजामुद्दीन पोलीस स्टेशन आहे. असे असूनही या आयोजनाला का थांबवलं नाही? याच्यासाठी गृहमंत्रालय जबाबदार नाही का?
- ज्या पद्धतीने या मर्कजमध्ये इतकी गर्दी झाली व कोरोना संसर्ग व प्रादुर्भाव सर्व राज्यांत झाला, ह्याकरता केंद्रीय गृहमंत्रालय जबाबदार नाही का?
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी रात्री दोन वाजता मर्कजमध्ये का पाठवलं? हे काम राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराचं आहे की दिल्ली पोलिसांचं?
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि तब्लिगी जमाचे मौलाना यांच्यात रात्री दोन वाजता काय गुप्त चर्चा झाली?
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि दिल्लीचे पोलीस आयुक्त या दोघांनी याविषयावर बोलणं का टाळलं?
- अजित डोवाल यांनी भेटल्यानंतर मौलाना साहेब कुठे गायब झाले? आता ते कुठे आहेत?
- कोणाशी याचे संबंध आहेत?
- मर्कजच्या आयोजनाची परवानगी तुमची?
- कार्यक्रमाला रोखलं नाही तुम्ही?
- तब्लिगींशी संबंध तुमचे, असे गंभीर आरोप करत या प्रश्नांची उत्तरे कोण देणार? असे प्रश्न गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपस्थित केले आहेत.
मर्कज म्हणजे काय? दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे 'मर्कज' (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत 'संस्थान' असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मर्कज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा- पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठं-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात, अशी माहिती तिथं द्यावी लागते) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते. (ही माहिती पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम समाजातील अभ्यासू व्यक्तीकडून घेतलेली आहे.)
दिल्लीतील मर्कज कार्यक्रमावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांचे केंद्रावर गंभीर आरोप