Farmers Loan Waiver | अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफीचा लाभ : अजित पवार
शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या यादीत 15 हजार 358 लाभार्थ्यांचा समावेश आहे. एप्रिल अखेरपर्यंत कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.
मुंबई : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचा लाभ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मागणी केली होती. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्ज मिळण्याबाबत प्रश्न होता.
राज्य सरकारने जी कर्जमाफी योजना लागू केली आहे. त्याचा लाभ सप्टेंबर 2019 पर्यंत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे, त्यांना मिळणार आहे. मात्र अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे ऑक्टोबर 2019 नंतर कर्ज थकीत आहे. अशा शेतकऱ्यांना सरकारने दिलासा द्यावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.
Farmers Loan Waiver | शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर
या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला जाईल, असं आश्वासन दिले. राज्यात दोन दिवसांपूर्वी कर्जमाफी योजना सुरु झाली आहे. तीन महिन्यात ही कर्जमाफी देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचंही अजित पवारांनी विधानसभेत सांगितलं.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच म्हणजेच 24 फेब्रुवारी रोजीठाकरे सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेची पहिली यादी जाहीर झाली झाली होती. कर्जमाफीच्या या यादीत 68 गावांमधील 15 हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. एप्रिल महिन्याअखेर या योजनेच्या अंमलबजावणीचं काम पूर्ण करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी लिंक करुन मगच कर्जमाफीचे पैसे जमा करण्यात येतील.
Farmers Loan Waiver | कर्जमाफीची पहिली यादी जाहीर; शेतकरी म्हणतात...
तर कर्जमुक्ती योजनेची दुसरी यादी 28 फेब्रुवारीला जाहीर होणार असल्याची घोषणा सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांचे कर्जखाते आधार कार्डशी जोडून त्यात कर्जमाफीचे पैसे जमा करणार असल्याचं सहकार मंत्र्यांनी म्हटलं.