एक्स्प्लोर
देवाची अती भक्ती करणाऱ्या आईचा मुलाने गळा चिरला
मुलानेच धारदार चाकूने गळा चिरुन आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूर पूर्व भागात घडली.

ठाणे: देवाची अति भक्ती करणे एका महिलेच्या जिवावर बेतले आहे. मुलानेच धारदार चाकूने गळा चिरुन आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बदलापूर पूर्व भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी मुलाला गजाआड केले आहे. तर आई गंभीर जखमी आहे. बदलापूर पूर्व येथील मिनाताई ठाकरे नगरमधील राणे चाळीमध्ये सुनिता धेंडे (44) ही महिला मुलगा आकाश धेंडे (21) याच्यासोबत राहते. बहुतेक घरात देव्हारा असतो, त्याप्रमाणे सुनिता यांच्याही घरी देव्हारा आहे. त्यांना देवभक्तीची आवड असल्याने त्या नेहमी देवपूजा करत. पण आपली आई सतत देवदेव करत असल्यामुळे त्याचा राग मुलगा आकाशला येत होता. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास देवदेव करण्याच्या कारणावरून आई आणि मुलामध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्या भांडणात संतापलेल्या आकाशने आई सुनिता हिच्या गळयात धारदार चाकू खुपसून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या सुनिता यांना उपचारासाठी केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यात आकाश धेंडेविरुध्द आईला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली. आकाशला न्यायालयात हजर केले असता 29 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल जाधव करीत आहेत.
Before You Go
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम






















