1993 Bomb Blast : 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणातील चार फरार आरोपींना अटक; गुजरात दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई
1993 Bombay Bomb Blast : गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत 1993 च्या बॉम्बे बॉम्बस्फोट प्रकरणातील चार फरार आरोपींना अटक केली आहे.
1993 Bomb Blast Criminals Arrested : संपूर्ण मुंबईला हादरवणाऱ्या 1993 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील (1993 Bomb Blast) चार फरार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने या प्रकरणातील चार फरार आरोपींना अटक केली असून अबू बकर, युसूफ भटका, शोएब कुरेशी उर्फ शोएब बाबा आणि सय्यद कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बॉम्बे बॉम्बस्फोट प्रकरणात चार फरार आरोपी दोन दशकांहून अधिक काळापासून वाँटेड होते. त्यांना दुबईतून डिपोर्ट करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू बकर हा मोहम्मद आणि मुस्तफा डोसाचा जवळचा सहकारी असल्याचे सुत्रानी सांगितले आहे. अबू बकर हे कुटुंबासह मुंबईतील अब्दुल रहमान स्ट्रीट येथे राहत होते. स्फोटानंतर तो परदेशात पळून गेला असून तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. ज्यानंतर आता अखेर त्याला अटक करण्यात आली आहे. या सर्वांचा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याचेही समोर आले आहे.
1993 साली मुंबईमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाने अनेकांची घरं उध्वस्त केली. दरम्यान या सर्वांच्या मागे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा संबंध असल्याचंही समोर आलं. दरम्यान त्यानंतर या बॉम्बस्फोटाशी संबधितांवर कारवायांचा सत्र अजूनही सुरुच आहे. आता गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (Gujrat ATS) चार फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. संबधित चारही आरोपी 1993 च्या स्फोटानंतर भारत सोडून फरार होते. त्यानंतर आता ते बनावट पासपोर्टच्या मदतीने भारतात अहमदाबादमध्ये आले होते. गुजरात एटीएसला याबाबतची माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे.
12 मार्च 1993 रोजी काय झालं ?
पहिला स्फोट : 12 मार्चच्या दुपारी मुंबईतील बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीबाहेर दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी देशाला हादरवणारा पहिला बॉम्बस्फोट झाला. या स्फोटाचा आवाज काही किलोमीटरपर्यंत पोहोचला. स्टॉक एक्सेंजच्या 29 व्या मजल्यावरील माणूसही जागच्या जागी पडला, एवढा मोठा हा स्फोट होता. स्फोटाच्या आजूबाजूला रक्ताचा सडा वाहू लागला. स्फोट झालेल्या ठिकाणी जवळपास 2 हजार लोकांची गर्दी होती. बेसमेंटच्या पार्किंगमध्ये आरडीएक्सनी भरलेल्या एका कारमध्ये हा स्फोट झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजबाहेरील या स्फोटात 84 लोकांचा मृत्यू आणि 200 हून अधिक लोक जखमी झाले.
दुसरा स्फोट : दुपारी 2.15 वाजता, नरसी नाथ स्ट्रीट
तिसरा स्फोट : दुपारी 2.30 वाजता, शिवसेना भवन
चौथा स्फोट : दुपारी 2.33 वाजता, एयर इंडिया बिल्डिंग
पाचवा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, सेंच्युरी बाजार
सहावा स्फोट : दुपारी 2.45 वाजता, माहिम
सातवा स्फोट : दुपारी 3.05 वाजता, झवेरी बाजार
आठवा स्फोट : दुपारी 3.10 वाजता, सी रॉक हॉटेल
नववा स्फोट : दुपारी 3.13 वाजता, प्लाझा सिनेमा
दहावा स्फोट : दुपारी 3.20 वाजता, जुहू सेंटॉर हॉटेल
अकरावा स्फोट : दुपारी 3.30 वाजता, सहार विमानतळ
बारावा स्फोट : दुपारी 3.40 वाजता, विमानतळ सेंटॉर हॉटेल
हे ही वाचा -