विनोद तावडे आणि कोचिंग क्लासेस मालकांमध्ये मोठी आर्थिक देवाणघेवाण, राष्ट्रवादीच्या अनिल देशमुखांचा गंभीर आरोप
सुरत येथील कोचिंग क्लासेसमधील आगीच्या घटनेनंतर क्लासेसच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबईत 30 ते 35 हजार कोचिंग क्लासेस आहेत, त्यांचे फायर ऑडिट होत नाही, ही चिंतेचा बाब आहे. त्यामुळे खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणी अनिल देशमुखांनी केली.

मुंबई : कोचिंग क्लासेसचे मालक व विनोद तावडे यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाली आहे. खाजगी शिकवणीबाबतचा मसुदा तयार असूनही तो पडून आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला.
शिक्षणमंत्री विनोद तावडे याकडे दुर्लक्ष करत असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून खाजगी शिकवणी मसुद्याला तात्काळ मंजुरी द्यावी, अशी मागणीही अनिल देशमुख यांनी केली.
सुरत येथे कोचिंग क्लासेसमध्ये भीषण आग लागण्याची दुर्दैवी घटना घडली दोन दिवसांपूर्वी घडली. यामध्ये 20 ते 22 मुलांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशात खळबळ उडाली. महाराष्ट्रात 1 लाख 10 हजारांच्यावर कोचिंग क्लासेस आहेत. त्यामध्ये मुंबईत 30 ते 35 हजार कोचिंग क्लासेस आहेत, त्यांचे फायर ऑडिट होत नाही. आग लागली तर बाहेर पडायला जागा नाही. या क्लासेसवर कोणतेही निर्बंध नाही. कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत, असा आरोपही अनिल देशमुख यांनी केला.
सुरतसारखी घटना महाराष्ट्रात किंवा मुंबईत घडू शकते. दुर्दैवाने अशी कोणती दुर्दैवी घटना घडली तर उपाययोजना करण्याची सोय शासनाकडे नाही, असंही अनिल देशमुख म्हणाले. 2017 मध्ये कोचिंग क्लासेसवर नेमण्यात आलेल्या समितीवर विधानसभेत चर्चा झाली होती. 12 लोकांच्या समितीने हा मसुदा तयार केला होता. 2018 ला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे पाठवला होता. परंतु ते अद्याप त्याचे कायद्यात रूपांतर करु शकले नाहीत, असं अनिल देशमुख यांना सांगितलं.
विनोद तावडे यांनी लवकरात लवकर नवीन कायदा तयार करु असं आश्वासन नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दिले होते. परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही असंही अनिल देशमुख म्हणाले. पक्षाच्यावतीने कोचिंग क्लासेसवर कायदा करावा अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. मात्र सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे कोचिंग क्लासेसला मदत करत आहेत, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
