(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fake currency : मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, सात कोटींच्या दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त
Fake Indian currency notes of 2000 : मुंबई गुन्हे शाखेनं बुधवारी सात कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.
Fake Indian currency notes of 2000 : मुंबई गुन्हे शाखेनं बुधवारी सात कोटी किंमतीच्या दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. दहिसर येथे सापळा रचून गुन्हे शाखेनं ही कारवाई केली आहे. बनावट नोटाप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेनं सात जणांना अटक केली आहे. बुधवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. सात आरोपींना न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
मुंबई गुन्हे शाखा यूनिट 11 ला बनावट नोटासंदर्भात माहिती मिळाली होती. काही लोक दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा घेऊन मुंबईत येणार आहेत. अशी माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचं एक पथक दहिसर येथे पोहचलं. गुन्हे शाखेने सापळा रचत आरोपी येत असलेल्या गाडीला थांबवलं अन् विचारपूस केली. तपासामध्ये या गाडीतून पाच कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या होत्या. दोन हजार रुपयांच्या 25 हजार नोटा मुंबई गुन्हे शाखेनं जप्त केल्या.
गाडीमधील आरोपींची गुन्हे शाखेनं कसून चौकशी केली. त्यांच्याकडून इतरांचीही माहिती मिळाली. हे सर्व हॉटेल अम्फा येथे थांबले होते. मुंबई गुन्हे शाखेनं हॉटेलवर धाड टाकली. येथून पोलिसांनी दोन हजार रुपयांच्या तब्बल दहा हजार बनावट नोटा जप्त केल्या. या नोटांची किंमत दोन कोटी रुपये इतकी आहे.
अशाप्रकारे मुंबई गुन्हे शाखेनं बुधवारी सात कोटी रुपये किंमतीच्या दोन हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्या. यासह एकूण सात आरोपींना अटक केली. या सर्व आरोपींना गुन्हे शाखेनं न्यायालयात हजर केलं होतं. न्यायालयाने या सातही आरोपींना 31 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस या आरोपींची कसून चौकशी करत आहे. या नोटा नेमक्या आल्या कुठून? यामध्ये कुणाचा हात आहे? मुंबईमध्ये लवकरच निवडणूका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस अधिक जागृत झाले आहे.