CDR आणि SDR काढणाऱ्या फसव्या डिटेक्टिव्हचा पर्दाफाश, 7 जणांना अटक
एका CDR साठी 40 हजार रुपये तर एका SDR साठी कमीत कमी 5 हजार रुपये या टोळीकडून घेतले जात होते. समोरच्याची आर्थिक परिस्थिती आणि त्याची गरज पाहून त्याच्याकडून पैसे घेतले जात होते.
मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचच्या युनिट 5 ने एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हला देशाच्या विविध भागातून CDR आणि SDR काढून देण्याप्रकरणी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी या टोळीचाही पर्दाफाश केला आहे. क्राईम ब्रांचने या प्रकरणी देशाच्या वेगवेगळ्या भागातून एकूण सात जणांना आत्तापर्यंत अटक केली आहे. यांच्यावर कलम 420, 467, 468, 34 आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अॅक्ट कलम 66, 72, 72 A आणि टेलिग्राफ ॲक्ट कलम 26 नुसार गुन्हा दाखल करून क्राइम ब्रांच याप्रकरणी तपास करत आहे.
क्राईम ब्रांचकडून मिळालेल्या माहितीनुसार हे आरोपी अनधिकृतपणे कॉल डेटा रेकॉर्ड (CDR) आणि सबस्क्रायबर डेटा रेकॉर्डची (SDR) खरेदी आणि विक्री करायचे. या कामासाठी देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये यांनी आपले एजंट्स ठेवले होते. यांच्याकडून तीनशेपेक्षा अधिक कॉल रेकॉर्ड आणि पाच लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर डेटा रेकॉर्ड पोलिसांनी जप्त केलं आहे. एका CDR साठी 40 हजार रुपये तर एका SDR साठी कमीत कमी 5 हजार रुपये या टोळीकडून घेतले जात होते. समोरच्याची आर्थिक परिस्थिती आणि त्याची गरज पाहून त्याच्याकडून पैसे घेतले जात होते.
कसा केला पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश?
क्राईम बँकेच्या अधिकार्यांना त्यांच्या खबरीकडून माहीती मिळाली होती की अशा प्रकारे CDR आणि SDR विकले जात आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांच्या एका पोलिसाला गिऱ्हाईक म्हणून टोळीच्या सदस्यांकडे पाठवलं. सर्वात आधी गिऱ्हाईक बनून गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची ओळख डिटेक्टिव शैलेश मांजरेकर आणि राजेंद्र साहू यांच्याशी झाली. या टोळीला रंगेहात अटक केल्यानंतर यांच्याकडून पेन ड्राइव्ह, लॅपटॉप, CDR आणि SDR पोलिसांनी जप्त केले आहेत. चौकशी नंतर काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. यांचं जाळे फक्त मुंबई पुरतेच मर्यादित नसून देशाच्या विविध राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये यांचे एजंट सक्रिय असून अशाप्रकारे गैररित्या CDR आणि SDR काढायचं काम करत असतात. दिल्ली, उत्तर प्रदेश, ओडिशा अशा विविध शहरांमध्ये या टोळीचे सदस्य सक्रिय आहेत. या टोळीचा मास्टर माईंड आठवी पास सौरभ साहू आहे जो गाजियाबादमध्ये राहतो. ही टोळी फक्त CDR आणि SDR काढून देण्यापुरतीच मर्यादित नसून लोकांच्या बँक अकाउंट डिटेल सुद्धा काढून देत होती. यांच्याकडून मोठ्या प्रमाणात डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि विविध बँकांचे पासबुक आणि चेकबुक सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहेत.