मुंबई : निरा-देवघर व गुंजवणी धरणाचे कालवे कार्यान्वित नसल्यामुळे विना वापर राहणारे पाणी समन्यायी तत्वावर तात्पुरत्या स्वरुपात निरा उजवा आणि डावा कालवा येथील लाभक्षेत्रास वाटप करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याचा फायदा दोन्ही कालव्यांच्या क्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगीकरण, कृषीपूरक उद्योग, साखर कारखाने, फळबागांना होईल.


निरा देवघर धरणाचे काम 2007 मध्ये पूर्ण झालं असून 11.73 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा निर्माण झालेला आहे. गुंजवणी धरणात सन 2018 पासून 3.69 टीएमसी पाणीसाठा निर्मित झालेला होता. या दोन्ही प्रकल्पांच्या कालव्याची कामे अपूर्ण असल्याने त्यांच्या नियोजित लाभक्षेत्रात पाणी वापर होऊ शकत नाही. ही बाब विचारात घेऊन या पाण्याचा वापर होण्याच्या दृष्टीने या दोन्ही धरणात उपलब्ध होणारे मूळ प्रकल्पाची गरज भागल्यावर शिल्लक राहणारे पाणी निरा डावा कालवा व निरा उजवा कालवा यात समन्यायी तत्वावर वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला. हे वाटप निरा डावा कालवा 55 टक्के आणि निरा उजवा कालवा 45 टक्के असं राहील.


या निर्णयामुळे दोन्ही कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये समन्यायी तत्वावर 2427 हेक्टर/टीएमसी या प्रमाणात पाणी सिंचनासाठी उपलब्ध होईल. निरा डावा कालव्याच्या लाभक्षेत्रातील पुरंदर व बारामती, इंदापूर तालुक्यातील 37,070 हेक्टर लाभक्षेत्राला व निरा उजव्या कालव्याच्या खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपूर सांगोला तालुक्यांच्या 65506 हेक्टर लाभक्षेत्राला फायदा होईल. आठ तालुक्यातील ग्रामीण, शहरी भागाच्या पाणी पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.


निरा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील बिगर बारमाही पंढरपूर व सांगोला तालुक्यातील ब्रँच 2 च्या खालील वितरिकांना उन्हाळी हंगामामध्ये सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणी उपलब्ध होईल. तसेच या दोन्ही कालव्यांच्या लाभक्षेत्रात झालेले नागरीकरण, औद्योगिकरण व परिसरातील कृषीपूरक उद्योग जसे साखर कारखाने, दुग्धव्यवसाय, पोल्ट्री फॉर्म आणि फळबागांवर अवलंबून असणारे उद्योग सुरळीतपणे चालू राहतील.


इतर बातम्या


राज्यसभेच्या एका जागेवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता, महाराष्ट्रातून कोण-कोण राज्यसभेवर जाणार?


औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला दणका, माजी महापौरांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेना प्रवेश