मुंबई  : औरंगाबाद महानगरपालिकेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी महापौर गजानन बारवाल आणि माजी शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मंत्री सुभाष देसाई, मिलिंद नार्वेकर, आमदार संजय शिरसाठ, अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी किशनचंद तनवाणी आणि गजानन बारवाल यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधले. किशनचंद तणवानी आणि बारवाल हे आधी शिवसेनेतच होते. शिवसेनेने तनवानी यांना आमदार देखील केलं होतं. तर बारवाल यांना महापौर केलं होतं.


पक्षप्रवेश झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष असताना तणवानी म्हणाले की, मी शहराध्यक्ष असताना प्रामाणिकपणे काम केलं परंतु स्थानिक गटबाजी आणि राजकारणामुळे भाजपला सोडचिठ्ठी देतो आहे. सध्या  प्राथमिक स्थरावर मी आणि गजानन बारवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. लवकरच आणखी काही पदाधिकारी आणि पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करतील. सुभाष देसाईं आम्हांला लवकरच तारीख कळवतील त्यादिवशी पक्षप्रवेश होतील. हा निर्णय मी भाजपमधील वरीष्ठ नेत्यांना देखील कळवला होता.



परंतु त्यांच्याकडून कोणतीही दखल घेण्यात न आल्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. माजी महापौर गजानन बारवाल म्हणाले की, भाजप दुटप्पी भूमिका घेणारा पक्ष आहे.  त्यामुळे आम्ही पक्षप्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत भाजपने दुटप्पी भूमिका घेतली. एकीकडे युतीची घोषणा केली आणि मतदानापूर्वी मात्र आम्हांला सांगण्यात आलं त्यांच्याविरोधात काम करा हे साफ चुकीचं होतं. अशा पद्धतीने शिवसेनेचे उमेदवार कसे पाडता येतील यासाठी भाजपचे नेते सक्रिय होते. ही बाब मला पटली नाही. त्यावेळी आमदार संजय शिरसाठ यांच्या देखील कानावर ही बाब घातली होती. अशा दुटप्पी भूमिका घेणाऱ्या पक्षात राहण्यापेक्षा स्वगृही परतलेलं बरं असा विचार करून आम्ही पक्षप्रवेश घेतला.




याबाबत बोलताना आमदार संजय शिरसाठ म्हणाले की, आज शिवजयंती असल्यामुळे राज्यभर विविध कार्यक्रम आहेत. त्यामुळे आम्ही सर्व पक्षप्रवेश मातोश्रीवर करू शकलो नाही. परंतु येत्या रविवारी आम्ही मोठा कार्यकर्ता मेळावा औरंगाबादमध्ये घेत आहोत. यावेळी मुख्यमंत्री देखील उपस्थित असतील. त्यांच्या उपस्थितीत इच्छुकांचे पक्षप्रवेश केले जातील. यावेळी पाच ते सहा नगरसेवक शिवसेनेत येतील. संजय शिरसाठ म्हणाले की, भाजपला वाटत होतं त्यांना कोणी हरवू शकत नाही. परंतु आगामी महापालिकेत शिवसेनेची सत्ता येईल.



सध्याचं औरंगाबाद महापालिकेतील पक्षीय बलाबल
शिवसेना - 29
भाजप - 22
एमआयएम - 25
कॉंग्रेस  - 10
राष्ट्रवादी - 03
बसप - 05
रिपब्लिकन पक्ष - 01
अपक्ष - 18