डोंबिवली : डोंबिवली शहराला लागून असलेल्या एमआयडीसीमुळे येथील नागरिक अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत. काल मेट्रोपोलिटन कंपनीला लागलेल्या आगीनंतर नागरिकांचा रोष बाहेर येऊ लागला असून आता या कंपन्या बंद करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. डोंबिवली एमआयडीसीतल्या मेट्रोपोलिटन कंपनीला काल भीषण आग लागली आणि डोंबिवलीत हाहा:कार माजला. या कंपनीत असलेल्या धोकादायक केमिकलच्या स्फोटांनी डोंबिवली अक्षरशः हादरुन गेली. मात्र या आगीनंतर आता अशा धोकादायक कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरु लागली आहे. कारण या कंपन्यांमुळे डोंबिवलीकर अक्षरशः जीव मुठीत घेऊन जगत आहेत.

डोंबिवलीच्या ज्या मेट्रोपोलिटन कंपनीला आग लागली होती, त्यात केमिकलचा प्रचंड मोठा साठा होता. आग लागल्यानंतर या केमिकलच्या ड्रमचे स्फोट होऊ लागले. मात्र सर्वात भयंकर होत्या त्या कंपनीतल्या भूमिगत केमिकलच्या टाक्या. कारण या टाक्यांमध्ये थोडंथोडकं नव्हे, तर तब्बल 13 टन ज्वलनशील केमिकल भरलं होतं. या टाक्या फुटल्या असत्या, तर किमान अर्धा किलोमीटरचा परिसर बेचिराख झाला असता. त्यामुळे आता यानिमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Dombivli Fire | डोंबिवलीतली आग दुसऱ्या दिवशीही धुमसतीच, परिसरात धुराचं साम्राज्य

काल लागलेल्या आगीनंतर औद्योगिक सुरक्षा विभागाने मेट्रोपोलिटन कंपनीवर कारवाई केली असून त्यांना उत्पादन बंद करण्याची नोटीस बजावली आहे. कंपनीची चौकशी करून तांत्रिक तपासाअंती कंपनीवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती औद्योगिक सुरक्षा विभागाचे सहसंचालक विनायक लोंढे यांनी दिली आहे.

मेट्रोपोलिटन कंपनीला लागलेल्या आगीच्या काही दिवस आधीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे याच भागात गुलाबी रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले होते. त्यावेळी कंपन्यांनी सुरक्षात्मक उपायोजना केल्या नाहीत, तर कंपन्यांना टाळं ठोकण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्यामुळे आता तरी अशा घातक रासायनिक कंपन्यांवर कारवाई होते का? आणि या कंपन्या इथून अन्यत्र स्थलांतरित केल्या जातात का? हे पाहावं लागेल.

Dombivli Fire | डोंबिवलीतील केमिकल कंपनीला लागलेली आग दहा तासानंतरही धुमसतीच, संपूर्ण शहरावर धुराचे ढग