मुंबई : राज्यात सीएए, एनआरसी, एनपीआर, कोरेगाव-भीमा, एल्गार परिषद शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. एल्गार परिषदच्या एनआयए चौकशीच्या मुद्द्यावरुन शरद पवारांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला समर्थन देण्याच्या मुद्द्यावरुनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली. राज्यसभेच्या सात जागांसाठी एप्रिल महिन्यात निवडणूक पार पडणार आहे. त्यावेळी आपले नेते राज्यसभेत पाठवण्यासाठी तिन्ही पक्षांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे येत्या काळात तिन्ही पक्षांमधील तणाव आणखी वाढण्याची चिन्ह आहेत.
महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकूण 19 जागा आहेत. महाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी एका राज्यसभेच्या खासदाराच्या नियुक्तीसाठी 37 आमदारांच्या पाठिंब्याची गरज असते. सध्याचं विधानसभेचं चित्र पाहिलं तर, भाजपचे 105 खासदार आहेत. त्या आधारावर भाजप तीन खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. तर शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 54 आणि काँग्रेसचे 44 आमदार सध्या विधानसभेत आहेत. या आधारावर इतर मित्रपक्षांच्या मदतीने महाविकास आघाडी चार खासदार राज्यसभेवर पाठवू शकते. त्यानुसार तिन्ही पक्ष आपला एक-एक सदस्य राज्यसभेत पाठवू शकतो, मात्र चौथा सदस्य कुणाचा असेल यावरुन रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
शिवसेना-राष्ट्रवादीत काय चाललंय? महाविकास आघाडीत सगळं सुरळीत आहे का?
कोणत्या सदस्यांचा कार्यकाळ संपतोय?
येत्या एप्रिल महिन्यात राज्यसभेचे एकून सात सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. निवृत्त सदस्यांपैकी शरद पवार यांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागणार यात शंका नाही.
महाराष्ट्रातून कोण-कोण राज्यसभेवर जाणार?
भाजप आपल्या आमदारांच्या संख्येवर तीन सदस्य राज्यसभेवर पाठवू शकेल. यामध्ये साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यसभेत पाठवण्याची शक्यता आहे. तर तिसऱ्या जागेसाठी भाजपकडून चाचपणी सुरु आहे. तर राष्ट्रवादीकडून शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जातील, हे नक्की आहे. काँग्रेसकडून कोण जाणार हे अजून तरी स्पष्ट नाही. तर शिवसेनेकडून काँग्रेसमधून आलेल्या प्रियांका चतुर्वेदी यांना संधी मिळू शकते.