(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eid a milad 2024 Holiday: मुंबईकरांचं लाँग हॉलिडेचं प्लॅनिंग बिघडणार, ईदची सुट्टी कॅन्सल, सरकार तातडीने आदेश काढणार
Anant Chaturdashi 2024: ईदची सुट्टी सोमवारी नाही तर बुधवारी, अनंत चतुर्दशीमुळे शासकीय सुट्टीचा दिवस बदलण्यात आला आहे. महायुती सरकारने कायदा-सुव्यवस्थेच्यादृष्टीने हा निर्णय घेतला आहे. सोमवारी, 16 सप्टेंबर रोजी यंदा ' ईद मिलाद उन- नबी आहे.
मुंबई: सध्या मुंबईसह राज्यात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. सणासुदीचे दिवस म्हटले की, या काळात मिळणाऱ्या सुट्ट्या या नोकरदारांसाठी एकप्रकारची पर्वणी असते. विकेंडच्या दिवसांना लागून येणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या (public holidays 2024) हा तर अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. आतादेखील विकेंडला लागून येणारी ईद (EID A Milad 2024) आणि अनंत चतुदर्शीची (Anant Chaturdashi 2024) सुट्टी पाहून अनेकांनी बाहेर फिरायला जाण्याचे किंवा निवांत आराम करण्याचे प्लॅन आखले असतील. पण मुंबई आणि उपनगरात काम करणाऱ्या नोकरदारांच्या या प्लॅनिंगचा विचका होण्याची शक्यता आहे. कारण राज्य सरकारने ईदच्या सुट्टीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
16 सप्टेंबर रोजी ईद अ मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण होणार आहे.पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जन्मदिनी 'ईद मिलाद उन -नबी' निमित्त मुस्लिम बांधव राज्यात जुलूस काढून मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करत असतात. सोमवारी, 16 सप्टेंबर रोजी यंदा ' ईद मिलाद उन- नबी आहे. यासाठी राज्य सरकारने शासकीय सुट्टी जाहीर केली होती. मात्र, 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थी असल्याने दोन्ही सणांमध्ये शांतता आणि सलोखा कायम राहावा, यासाठी मुंबई शहर आणि उपनगरासह इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिमधर्मियांनी जुलूस काढण्याचा निर्णय 18 सप्टेंबर रोजी घेतला आहे.
त्यामुळे 16 सप्टेंबर रोजी देण्यात येणारी शासकीय सुट्टी रद्द करून ती 18 सप्टेंबर रोजी मुंबई शहर व उपनगर या भागात देण्यात येणार आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाने , जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढून निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत .
नंदुरबारमध्ये मुस्लीम समाजाचा महत्त्वाचा निर्णय
नंदुरबार जिल्ह्यात ईद –ई- मिलाद अर्थात हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती निमित्त होणारी मिरवणूक 16 ऐवजी 19 सप्टेंबर रोजी करण्याचा निर्णय शहादा येथील मुस्लीम समाजाने घेतला आहे. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी मुस्लीम समाज बांधवांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रशासन आणि पोलीस यंत्रणांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
समाजवादी पक्षाची मागणी मान्य
पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिन 'ईद मिलाद उन - नबी निमित्तची शासकीय सुट्टी यंदाच्या वर्षी बुधवार, 18 सप्टेंबर रोजी जाहीर करावी, अशी मागणी समाजवादी पक्षाचे 'भिवंडी पूर्व'चे आमदार रईस शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. यासंदर्भात आमदार शेख यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहिले होते.
16 सप्टेंबर रोजी गणेश विसर्जनाच्या राज्यात मिरवणुका आहेत. राज्यात सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी मुस्लिम धर्मगुरू, लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक यांनी पैगंबर हजरत मोहम्मद जन्मदिन उत्सवाचे जुलूस बुधवारी, 18 सप्टेंबर रोजी काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी शासनाने सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी केल्याचे रईस शेख यांनी सांगितले होते.
आणखी वाचा
आषाढी एकादशीच्या दिवशीच बकरी ईद; राज्यातील अनेक भागात मुस्लीम बांधवांचा कुर्बानी न करण्याचा निर्णय