डोंबिवली : डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरु करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं उच्च न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ही परवानगी दिली असून आता रुग्णालय सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेत 580 बेड्सचे रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरु केली आहे.


डोंबिवली महापालिका हद्दीत महापालिकेची 7 आणि 90 खासगी कोविड रुग्णालये आहेत. कोरोनाच्या दुसरी लाटेचा सामना सुरु असताना भविष्यात तिसऱ्या लाटेचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीत रुग्णांसाठी क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात आणि टेनिस कोर्टावर कोविड रुग्णालय सुरु करण्याचा विचार आहे. त्याचबरोबर क्रिडासंकुल ही महापालिकेचा बीओटी तत्त्वावर कोणार्क कंपनीनं विकसित करण्यासाठी दिलेली मालमत्ता आहे. या ठिकाणी 265 बेडचे कोविड रुग्णालय सुरु करण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला होता. मात्र त्या ठिकाणी पाणी आणि विजेची सुविधा तयार करावी लागणार असल्याने महापालिकेने दुसरी जागा शोधली आहे. 


क्रीडा संकुलापासून 200 मीटरच्या अंतरावर विभा कंपनी आहे. या कंपनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या कंपनीच्या तयार इमारतीत कोविड रुग्णालय सुरु करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्वांसमोर मांडला होता. मात्र कंपनीचे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने महापालिकेने न्यायालयाची परवानगी घेणं आवश्यक होतं. त्यामुळे डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरु करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं उच्च न्यायालयाकडे मागितली होती. कोरोना परिस्थिती पाहता न्यायालयाने महापालिकेस विभा कंपनीच्या इमारतीत कोविड रुग्णालय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी न्यायालयाने सत्य प्रतिज्ञापत्र सादर करा असे सांगितले होते.


दरम्यान, महापालिकेने सत्य प्रतिज्ञापत्र सादर केले असून, विभा कंपनीच्या जागेत प्रशस्त कोविड रुग्णालय सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. त्याच्या कामासाठी एक कोटी 50 लाखांची निविदा काढण्यात आलेली आहे. या रुग्णालयात 360 ऑक्सिजन आणि 220 आयसीयू बेड उपलब्ध होणार आहेत. रुग्णालय येत्या महिनाभरात सुरु होईल असं महापालिका प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :