मुंबई : सीबीआयकडनं दाखल गुन्हा रद्द करण्यासाठी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या पत्रातील आरोपांची प्राथमिक चौकशी करून सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे. 24 एप्रिलला अनिल देशमुखांच्या राज्यभरातील निवासस्थानांवर छापे टाकून सीबीआयनं नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी देशमुखांची चौकशीही केली होती. या छापेमारीत सीबीआयनं अनेक कागदपत्रं आणि इतर साहित्य आपल्या ताब्यात घेतलं आहे. मात्र याप्रकरणी तपासयंत्रणेला आपण पूर्ण सहकार्य करण्यास तयार असून कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून त्यांना रोखावं अशी प्रमुख मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. या याचिकेवर या आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.


परमबीर सिंह यांच्याकडून अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. पोलीस आयुक्तपदाच्या पदावरील अधिकाऱ्यानं सेवेत असताना थेट राज्याच्या गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणं ही एक दुर्मिळ घटना आहे, असं मत व्यक्त करत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची सीबाआयमार्फत प्राथमिक चौकशी करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले होते. त्यानुसार सीबीआयनं हा गुन्हा दाखल केला आहे.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या तीन जनहित याचिका आणि एक फौजदारी रिट याचिका सोमवारी हायकोर्टानं निकाली काढताना हे चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी सीबीआयनं चौकशीनंतर गुन्हा दाखल केल्यानं महाविकास आघाडी सरकारवर मोठी नामुष्की ओढावली आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदावरून होमगार्डच्या महासंचालक पदी उचलबांगडी होताच परमबीर सिंह यांनी पत्र लिहून देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत.