पालघर :  काही दिवसांपूर्वी नाशिकच्या रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या 22 जणांचा ऑक्सिजन गळतीमुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्या घटनेची पुनरावृत्ती आज संध्याकाळी 6 वाजता विक्रमगड तालुक्यात असलेल्या रिव्हेरा हॉस्पिटलमध्ये होता होता टळली. अचानक रिव्हेरा कोव्हिड रुग्णालयातील जम्बो ऑक्सिजन टॅंकचा वॉल लिकेज झाल्याने ऑक्‍सिजन  गळतीला सुरुवात झाली. 


त्यामुळे एकच खळबळ माजली. तातडीने प्रसंगावधान राखल्याने मोठी हानी टळली. या रुग्णालयात 302 रुग्ण उपचार घेत असुन एकूण 80 रुग्ण ऑक्सिजन वर असल्याची माहिती अतिरिक्त नोडल ऑफिसर डॉ.रामदास मराड यांनी दिली. या प्रकरणात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वेळीच धाव घेत घटनास्थळी पोहोचून माहिती घेतली.   रिव्हेरा हॉस्पिटलचे मुख्य नोडल अधिकारी डॉ.प्रशांत राजगुरू यांनी तातडीने  सर्व ऑक्सिजन वर असलेल्या रुग्णांना अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडरने जोडल्याने दुर्घटना टळली.


हा प्रकार घडताच तातडीने अग्निशमन दल आणि तज्ञ मंडळींना पाचारण करण्यात आलं. पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ यांनीही घटनास्थळी येऊन पाहणी केली. हा प्रकार ऑक्सिजन लोड करताना वॉल थोडासा लीक झाल्याने घडला असल्याचं त्यांनी सांगितलं. 


जम्बो ऑक्सिजन टँक मधून येणारा ऑक्सिजन पाईप लूज झाल्याने थोड्या प्रमाणात ऑक्सिजन लिकेज होत होता. लक्षात येताच तात्काळ दुरुस्त करण्यात आला. हॉस्पिटलमध्ये सध्या 302 रुग्ण आहेत तर 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असं डॉ. रामदास मराड यांनी सांगितलं.