सातारा  : सातारा जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे सातारा जिल्हा प्रशासनाने आता कडक लॉकडाऊनची घोषणा केली असून याची अंमलबजावणी आज मंगळवारपासून होत आहे. मेडिकलची दुकाने वगळता सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश देण्यात आला आहे.


राज्यभर अंशत: लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही कोरोनाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढताना पहायला मिळत होती. गेल्या आठवडाभर दररोज सुमारे 2 हजार 500 च्या आसपास कोरोना बाधितांची नोंद होताना पाहायला मिळत होती. तर गेल्या आठवड्यापासून  बाधित मृत्यूंचा आकडाही दिवसेंदिवस वाढतानाचे चित्र दिसत होते. गेल्या आठवड्यात तब्बल 16 हजार 763 कोरोना बाधितांची नोंद झाली. तर जवळपास 500 च्या आसपास बाधितांचा मृत्यू झाला. 


अशा परिस्थितीत कडक लॉकडाऊन करणे गरजेचे असल्याचे मत असंख्य सातारकरांचे होते. त्यात सातारा कोविड डिफेंन्डर गृपच्या वतीनेही कडक लॉकडाऊनची मागणी करण्यात आली होती. तसेच पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या झालेल्या बैठकीतही एकमुखी सातारा जिल्ह्यात कडक लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचं मत व्यक्त करण्यात आल्यानंतर प्रभारी जिल्हा दंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी काल आदेश काढून आजपासून सात दिवसाचा कडक लॉकडाऊनचा आदेश देण्यात आला.


यामध्ये वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकाने ही बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकानांमधील सर्व दुकानदारांना मात्र घरपोच सेवा देता येणार आहे.  ही घरपोच सेवा सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंतच देता येणार आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणाव्यतिरीक्त इतर कोणालाही घरातून बाहेर पडता येणार नाही. वैद्यकीय कारणाव्यतरिक्त बाहेर दिसणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाईसाठी आता प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून आज पोलिसांचा मोठा फौजफाटा चौकाचौकात उभा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली.