पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची 56 लाखांची फसवणूक, चार जणांना ठोकल्या बेड्या
Dombivali news update : पैशांचा पाऊस पाडून पाच कोटी मिळवून देतो असे आमिष दाखवत एका टोळीने डोंबिवलीतील व्यावसायिकाची 56 लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
मुंबई : झटपट पैसे मिळवण्याच्या लालसेपोटी अंधश्रद्धेच्या आहारी जात डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिक तब्बल 56 लाख रुपये गमावून बसल्याची घटना समोर आली आहे. डोंबिवलीतील ठाकुर्ली परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांना पैशांचा पाऊस पाडून पाच कोटी मिळवून देतो असे आमिष दाखवत तांत्रिक टोळीने त्यांची 56 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. अशोक गायकवाड, रमेश मुकणे, संजय भोळे याच्यासह एकाला ताब्यात घेतलं आहे.
सुरेंद्र पाटील यांना त्यांच्या दावडी गाव येथील कार्यालयात अशोक गायकवाड नावाच्या व्यक्तीची भेट झाली. अशोक गायकवाड याने पैशाचा पाऊस पाडणारा व्यक्ती आपल्याकडे असून थोडाफार खर्च करण्याची तयारी दाखविल्यास पाट कोटी रुपयांचा पाऊस कार्यालयात पडेल असे आमिष दाखवले. पाट कोटींच्या आमिषाला बळी पडून सुरेंद्र पाटील यांनी होकार दिला. त्यानुसार अशोक गायकवाड याच्यासह पाच जणांनी त्यांच्या कार्यालयात 25 जून रोजी सकाळी पूजा करण्याचे ठरवले.
पूजा करण्याच्या बहाण्याने पाटील यांच्याकडून 56 लाख रुपये पूजेच्या ठिकाणी ठेवण्यास सांगितले. पूजा पूर्ण झाल्यानंतर पाटील यांना कार्यालय असलेल्या इमारतीला पाच प्रदक्षिणा मारत मंतरलेले पाणी शिंपडन्यास सांगितले. पाणी शिंपडण्यासाठी पाटील बाहेर पडले. त्यानंतर पुन्हा ऑफिसमध्ये आले असता हे पाच ही जण कार्यालयातून पैसे घेवून पळून गेले होते. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पाटील यांनी याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.
मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी फसवणुकी बरोबरच महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी कृत्य प्रतिबंध व निर्मुलन आणि काळा जादू नियमाचे कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजच्या आधारे या मधील चार जणांना ताब्यात घेत चौकशी सुरु केली आहे. अशोक गायकवाड, रमेश मुकणे, संजय भोळे आणि त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतलं आहे, अशी माहिती डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बाडगे यांनी दिली.