ठाणे : covid-19 मुळे देशात लॉकडाऊन असल्याने अनेक उद्योगधंदे डबघाईला आलेले आहेत. वृत्तपत्र विक्री देखील त्यापैकीच एक व्यवसाय. मात्र तब्बल अडीच महिन्यांनी राज्यसरकारने वृत्तपत्र विक्रीला परवानगी दिली असली, तरी अनेक गृहसंकुलात या विक्रेत्यांना बंदी घातल्याने वृत्तपत्र विक्रेते रडकुंडीस आले आहेत. त्यामुळेच ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेते असोसिएशनने यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार दिली असून अशा गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आपल्या मागण्यांचे एक निवेदन वृत्तपत्र विक्रेते असोसिएशनने पोलीस उपायुक्त अविनाश आंबुरे यांना दिले आहे.


Covid-19 चा धोका कमी व्हावा या उद्देशाने राज्यसरकारने वृत्तपत्र विक्रेत्यांवर देखील बंदी आणली होती. तब्बल अडीच महिने हे सर्व वृत्तपत्र विक्रेते घरातच बसून होते. त्यांच्यासाठी उदरनिर्वाहाचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांची परिस्थिती हलाखीची बनली होती. अनेकांची फेब्रुवरी, मार्च महिन्याची बिलेदेखील अडकुन पडली आहेत. मात्र मिशन बिगीन अगेनच्या माध्यमातून राज्य सरकारने वृत्तपत्र विक्री देखील परवानगी दिल्याने या सर्व विक्रेत्यांनी पुन्हा एकदा उत्साहाने काम करण्यास सुरुवात केली होती.


पाहा व्हिडीओ : कोरोनाला हरवण्यास आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी कशी मदत करणार? कसा असेल औषधांचा डोस?



स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून हे विक्रेते घरोघरी वृत्तपत्र पोहोचण्यास तयार झाले असले तरी अजूनही अनेक गृहसंकुले या विक्रेत्यांना गेटच्या आत देखील प्रवेश देत नाहीत. त्यामुळे या विक्रेत्यांच्या आनंदावर विरजण पडले आहे. म्हणून कोरोना संसर्गाच्या भीतीने कोपरी, वर्तकनगर, चितळसर, कापुरबावडी आणि कासारवडवली पोलीस क्षेत्रातील काही सोसायट्या आणि इमारतींच्या पदाधिकाऱ्यांनी पेपरवाल्या मुलांना गृहसंकुलाच्या प्रवेशद्वाराच्या आत घेण्यास मज्जाव केल्याची तक्रार वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनने पोलिसांकडे केली आहे. ठाण्यातील पोलीस उपायुक्त अविनाश अंभोरे यांना आपल्या मागण्यांचे एक निवेदन असोसिएशनने सुपूर्त केले असून आडमुठ्या स्वभावाच्या या लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. याप्रसंगी असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, प्रमोद पत्ताडे इत्यादी उपस्थित होते.


दरम्यान, राज्यशासनाने वृत्तपत्र घरपोच देण्याचे आदेश दिले असल्याने या गृहसंकुलातील पदाधिकाऱ्यांना वृत्तपत्र विक्रेत्यांना रोखता येणार नाही. मात्र तरीही काही जण त्यांना मज्जाव करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडलेल्या या वृत्तपत्र विक्रेत्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे.


संबंधित बातम्या :


गणोशोत्सवाबाबत सरकारचा निर्णय मान्य असेल, मुबंईतील गणोशोत्सव मंडळांची भूमिका


अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गरजू नाट्यकर्मीना करणार 1 कोटी 20 लाखांची मदत


लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जी बिस्किटांची जबरदस्त विक्री, 82 वर्षांचा विक्रम मोडला!