मुंबई : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुंबईतील पाच प्रमुख गणेश मंडळांची आज बैठक बोलावली होती. या बैठकीत गणेशोत्सव साजरा करणार आणि कशा प्रकारे तो करता येईल यासंदर्भात त्यांच्याकडून सूचना जाणून घेतल्या. या बैठकीमध्ये मुंबईचा राजा गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,नरे पार्क, लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ, तेजुकाया गणेशोत्सव मंडळ, चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सरकार जो निर्णय घेईल तो मान्य असेल असंही गणेशोत्सव मंडळांनी म्हटलं आहे.
मुंबईमध्ये गणेशोत्सव काळात मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी बाहेर निघतात. या मंडळांनी सामंजस्याची भूमिका घेत शासनावर निर्णय सोपवला आहे. राज्य शासन जो निर्णय घेईल आणि जी नियमावली तयार करेल ती आम्हाला मान्य असेल. कारण लोकांचे प्राण जास्त महत्वाचे आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जर गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला, तरी आम्ही त्याचे स्वागत करू, अशी भूमिका गणेशगल्ली गणेशोत्सव मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी मांडली.
गणेश उत्सवाची सुरूवात लोकमान्य टिळकांनी इंग्रजांच्या काळात केली होती, जेणेकरून लोकांनी एकत्र यावं. आणि इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावा. त्या गणेशोत्सवावर आता कोरोना व्हायरसचं सावट पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. मुंबईमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवात गणेश मंडळांकडून कशाप्रकारे खबरदारी घेण्यात येईत आणि काय नियोजन असेल या संदर्भातल्या सूचना मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जाणून घेण्यासाठी पाच प्रमुख गणेश मंडळाची बैठक बोलावली होती. बैठकीला उपस्थित असलेले सर्व प्रतिनिधी लालबाग परळ या भागातील मंडळाचे होते.
Ganesh Utsav सरकार घेईल तो निर्णय मान्य,गणेश मंडळांची भूमिका,मुंबई गणेशोत्सवाबाबतचा निर्णय शासनाकडे