मुंबई : कोरोना व्हायरसमुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक क्षेत्रांमधील कंपन्यांना नुकसान होत असलं तरी पार्ले-जी बिस्किटांची एवढी विक्री झाली आहे की मागील 82 वर्षांचा विक्रम मोडला आहे. केवळ पाच रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शहरातून आपापल्या गावाला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी संजिवनी देणारा ठरला आहे. शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार पार्ले-जी बिस्कीट होतं. काहींनी स्वत: खरेदी करुन खाल्लं तर काहींनी दुसऱ्यांसाठी मदत म्हणून बिस्किटं वाटली. लॉकडाऊनदरम्यान बहुतांश लोकांनी आपल्या घरी पार्ले-जी बिस्किटांचा स्टॉकच करुन ठेवला होता.


आठ दशकांमधील सर्वाधिक विक्री
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान पार्ले-जीची विक्री विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. पार्ले-जी हे 1938 पासूनच ओळखीचं नाव असून अनेकांचा आवडता ब्रॅण्ड आहे. पार्ले प्रॉडक्ट्सने पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीचे आकडे देण्यास नकार दिला. परंतु यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात पार्ले-जी बिस्किटांची विक्री ही मागील आठ दशकांमधील सर्वाधिक ठरल्याचं सांगितलं.


पार्ले-जी सामान्यांचं बिस्कीट : मयांक शाह
"कंपनीचा एकूण मार्केट शेअर जवळपास पाच टक्क्यांनी वाढला आहे. यापैकी 80 ते 90 टक्के वाढ पार्ले-जी बिस्किटांच्या विक्रीतून झाली आहे," असं पार्ले प्रॉडक्ट्सचे कॅटेगरी हेड मयांक शाह म्हणाले. "पार्ले-जी हे सामान्यांचं बिस्कीट आहे, ज्या लोकांना ब्रेड परवडत नाही ते पार्ले-जी खरेदी करु शकतात. कोरोना संकटादरम्यान अनेक राज्य सरकारांनी आणि सामाजिक संस्थांनी मोठ्या प्रमाणात पार्ले-जी बिस्किटांची खरेदी केली," असंही त्यांनी सांगितलं.


लॉकडाऊनमध्ये मजुरांनी 'पार्ले-जी'वर भूक शमवली
कोरोना संकटादरम्यान बहुतांश लोकांनी घरात चहासोबत खाण्यासाठी पार्लेजी बिस्किटांची खरेदी केली. तर आर्थिक परिस्थिती चांगली असलेल्या लोकांनी पायी प्रवास करणाऱ्या मजुरांना वाटण्यासाठीही पार्ले जी बिस्किटांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली होती. यासोबतच कोरोना संकटाच्या काळात शहरातून आपल्या गावाला परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांनीही वाटेत पार्ले जी बिस्किटांच्या माध्यमातून आपली, कुटुंबीयांची आणि मुलांची भूक शमवण्याचा प्रयत्न केला.


याशिवाय गुड्डे, बॉरबोन, टायगर, मारी, मिल्क बिकीज या बिस्किटांसह पार्ले प्रॉडक्ट्सच्या मोनॅको या बिस्किटाच्या विक्रीतही वाढ पाहायला मिळाली. मागणी वाढल्यामुळे बिस्किट कंपन्यांन्या लॉकडाऊनच्या काळातही मॅन्युफॅक्चरिंग आणि डिस्ट्रिब्युशनची साखळी मजबूत करावी लागली.