Eknath Shinde : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावित, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
Mumbai District Planning Committee : मुंबईच्या विकासासाठी 553 कोटींच्या वार्षिक योजनेला मंजुरी देण्यात आली असून गृहनिर्माण, आरोग्य, रस्ते, पोलिस गृहनिर्माण यांना प्राधान्य दिले जाणार आहे.

मुंबई : जिल्हा नियोजन समितीमार्फत (District Planning Committee) करण्यात येणारी सर्व विकासकामे उच्च दर्जाची असावीत आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण व्हावीत, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले. दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झालेली कामे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाची ठरतात. तसेच नागरिकांपर्यंत प्रत्येक योजना प्रभावीपणे पोहचवून जिल्हा सर्व शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये (Sustainable Development Goals) अग्रेसर ठेवावा असं शिंदे म्हणाले.
मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीची बैठक वर्ल्ड ट्रेड सेंटर कॉम्प्लेक्स येथे झाली. बैठकीस उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्री मंगल प्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, आयुक्त भूषण गगराणी, जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि विविध लोकप्रतिनिधी तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Mumbai District Planning Committee : मंजूर निधी वेळेत खर्च करा
बैठकीत जिल्हा वार्षिक योजना 2025-2026 अंतर्गत 553 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. यामध्ये सर्वसाधारण योजनेसाठी 528 कोटी रुपये आणि अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 22 कोटी रुपयांचा समावेश आहे. हा निधी मंजूर प्रकल्पांवर निश्चित मुदतीत खर्च झाला पाहिजे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. तसेच 2024-2025 या कालावधीत एकूण 509 कोटी रुपयांचा प्रत्यक्ष खर्च झाला असून या खर्चाला बैठकीत मान्यता देण्यात आली.
Mumbai Housing : गृहप्रकल्प, आरोग्य आणि शहर विकासावर भर
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबईतील रखडलेले गृहप्रकल्प प्राधान्याने मार्गी लावले जातील. एसआरए, म्हाडा, एमएमआरडीए, सिडको आणि महानगरपालिका या संस्थांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे.
सामान्य लोकांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी यासाठी हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना सुरू करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमआरआय मशीनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुंबईला जागतिक दर्जाचे शहर ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम, प्रदूषण नियंत्रण आणि वृक्षारोपण या उपक्रमांनाही गती देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
खड्डेमुक्त रस्ते आणि उद्यानांचा विकास
शहरातील सर्व फ्लायओव्हर खड्डेमुक्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर तातडीने कामे सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. पिण्याच्या पाण्याचा सुरळीत पुरवठा आणि उद्यानांची डागडुजी यावरही लक्ष केंद्रित करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी निर्देश दिले
पोलिस घरकुल आणि रोजगार निर्मितीवर भर
विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मुंबईतील पोलिसांच्या घरकुलाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करण्याची गरज असल्याचे नमूद केले. दरम्यान, 2028 पर्यंत जिल्ह्याचा GDP दुप्पट करण्याचे लक्ष्य ठेवून मत्स्यव्यवसाय, रत्न-दागिने, लेदर, पर्यटन, आरोग्य, वाहतूक आणि रिअल इस्टेट या क्षेत्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी जिल्हा विकास आराखड्याबाबत माहिती देताना वार्षिक योजनेतील 33 टक्के निधी हा या कृती आराखड्यासाठी निश्चित करण्यात आल्याचे सांगितले.
ही बातमी वाचा:
- देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?























