एक्स्प्लोर
राष्ट्रवादी काँग्रेसमुळे खातेवाटप लांबणीवर; दिग्गजांना कमी महत्वाची खाती मिळाल्यानं नाराजी?
ठाकरे सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमुळे खातेवाटप लांबल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तारानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत खातेवाटप करण्याची पद्धत आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खातेवाटपावरुन सुरू असलेल्या वादामुळे खातेवाटप लांबल्याचे बोलले जात आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जवळच्या मंत्र्यांकडे अत्यंत महत्त्वाची खाती देण्यात आली. त्यामुळे ही राष्ट्रवादीच्या गोटात कुरबूर सुरू झाल्याचे बोलले जात आहे. परिणामी आज किंवा उद्या खातेवाटप होऊ शकतं, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांच्या जवळचे मानले जातात. त्यांना गृह खाते मिळण्याची शक्यता असताना त्यांना कामगार खात्याची जबाबदारी दिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. तर, निवडणूक अर्ज भरण्यावेळी तळ्यातमळ्यात असणारे विदर्भातील अनिल देशमुख यांना महत्वाचे गृह खाते दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. हाच न्याय इतर नेत्यांसोबत केल्याचेही बोलले जात आहे. जितेंद्र आव्हाड यांना गृहनिर्माण खाते, तर वळसे यांना कामगार खाते हे गणित देखील अनेकांना खटकले आहे. हेही वाचा - 'ठाकरे' सरकारनं मित्रपक्षांचा विश्वासघात केला, माजी मंत्री बबनराव लोणीकरांची टीका अजित पवार यांचे खंदे समर्थक धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्यायसारखे खाते, तर राष्ट्रवादीचे ओबीसी चेहारा असलेले ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अन्न व नागरी पुरवठा खाते दिले आहे. एकेकाळी अजित पवार यांच्याकडे असलेले जलसंधारण खाते मात्र यावेळी जयंत पाटील यांनी मिळवले आहे. याव्यतिरिक्त बाळासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खात्याची मोठी जबाबदारी दिली आहे. तर, नवाब मलिक यांना राज्य उत्पादन शुल्क खाते काय विचार करुन दिले असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कागलचे हसन मुश्रीफ यांच्याकडे ग्रामविकास खाते सोपावण्यात येणार आहे. खातेवाटपावरुन राष्ट्रवादीत सुरू असलेल्या घोळामुळेच शिवसेना आणि काँग्रेसचे खातेवाटप तयार असताना देखील खातेवाटप लांबल्याचे बोलले जात आहे. हेही वाचा - दोन लाखांवरच्या शेतकरी कर्जदारांसाठी कर्जमाफीची नवी योजना आणणार : मुख्यमंत्री Dhananjay Munde | मुलाचा शपथविधी पाहून धनंजय मुंडेंच्या आईला अश्रू अनावर | ABP Majha
आणखी वाचा























