Disha Salian Case Narayan Rane:  दिशा सालियनबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर, आता त्यांना मालवणी पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नितेश राणेंना ३ मार्च रोजी, तर नारायण राणेंना ४ मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश नोटिशीद्वारे देण्यात आलेत. 


दिशा सालियनवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचं वक्तव्य नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत केलं होतं. त्यानंतर तिच्या पालकांनी नारायण राणे आणि नितेश राणेंविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या संदर्भात महिला आयोगाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर नारायण आणि नितेश राणेंविरोधात मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यानंतर आता त्यांची या वक्तव्याप्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. 


दिशाच्या पालकांची महिला आयोगाकडे धाव


केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी दिशा सालियनच्या आई-वडीलांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. राणेंच्या आरोपांमुळे दिवगंत दिशाची नाहक बदनामी होत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. त्यानंतर राज्य महिला आयोगाने मालवणी पोलीस ठाण्याकडून दिशाच्या मृत्यू प्रकरणाचा अहवाल मागितला होता. 


मालवणी पोलिसांचा अहवाल काय?


दिशाचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असून तिच्यावर कोणतेही अत्याचार करण्यात आले नव्हते असे अहवालात नमूद करण्यात आले होते. मालवणी पोलिसांच्या अहवालानंतर राज्य महिला आयोगाने नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिले. 


पाहा: राणे पिता-पुत्रांना मालवणी पोलिसांची नोटीस



काय म्हणाले होते नारायण राणे? 


अभिनेता सुशांत सिंह हा दिशा सालियनच्या हत्येचा पर्दाफाश करणार होता, म्हणून त्याची हत्या करण्यात आली असल्याचे खळबळजनक वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. दिशा सालियनची बलात्कार करुन हत्या करण्यात आली असल्याचा  आरोप केला होता. पत्रकार परिषदेत नारायण राणेंनी म्हटले की, तिने आत्महत्या केली नव्हती, तर तिची हत्या करण्यात आली. यावेळी तिथे कोणत्या मंत्र्यांची गाडी होती ? असा सवालही यावेळी राणेंनी उपस्थित केला.  सुशांतच्या घरातील सावंत नावाचा मुलगा कुठे गेला? तो अद्याप बेपत्ता आहे. तसेच रॉय म्हणायचा मुलगा होता, तो कुठे गेला, तोही अद्याप गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. तसेच दिशा सालियनच्या घरातील वॉचमन कुठे आहे? तो देखील गायब असल्याचे राणे यावेळी म्हणाले. कोण काहीतरी लपवते, हेच यावरुन स्पष्ट होत असल्याचे राणेंनी यावेळी सांगितले. लपवलेल्या गोष्टी बाहेर याव्यात असेही राणेंनी म्हटले होते.


इतर महत्त्वाच्या बातम्या: