Disha Salian Death : दिशा सालियनच्या आत्महत्येबाबत तिच्या आई-वडिलांनी अखेर मौन सोडले आहे. दिशा सालियनच्या आत्महत्येवर सुरू असलेले राजकारण दुर्दैवी असून हा प्रकार थांबवण्याची विनंती दिशा सालियनच्या आई वडिलांनी केली आहे. या प्रकरणात होत असलेल्या आरोपांमुळे आमच्या मुलीचा दररोज मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. कामाच्या तणावातून तिने आत्महत्या केली असल्याचे दिशाच्या आईने सांगितले. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सातत्याने दिशा सालियनच्या आत्महत्येवर भाजप आमदार नितेश राणे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीदेखील दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली असल्याचा आरोप केला. 


...म्हणून दिशाची आत्महत्या


ऑफिसमधील तणावामुळे दिशाने आत्महत्या केली असल्याचे तिच्या पालकांनी माध्यमांना सांगितले. व्यावसायिक डील रद्द होत असल्याचे तिने घरी सांगितले होते. त्या तणावात ती होती असेही पालकांनी सांगितले. आम्ही ज्यांना मतदान करतोय तेच आमच्या मुलीला बदनाम करत आहेत अशी खंतही दिशा सालियनच्या आईने व्यक्त केली. पोस्टमार्टेम अहवालात तिच्या मृत्यूचे कारण समोर आलं आहे. तरीदेखील तिच्यावर बलात्कार झाला, तिची हत्या झाली असे सांगून बदनामी का करत आहात, असा प्रश्नही दिशाच्या आईंनी उपस्थित केला. 


आत्महत्येचा विचार येतोय; दिशाच्या पालकांचे वक्तव्य


मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या सदस्यांसह दिशा सालियनच्या पालकांची भेट घेतली. या भेटीमध्ये दिशा सालियनच्या आई वडिलांनी महिला आयोगाकडे तक्रार अर्ज केला. त्यानंतर दिशाच्या आई-वडिलांनी माध्यमांद्वारे आवाहन केले. दिशाच्या आई म्हणाल्या की, मुलीच्या आत्महत्येबाबत पोलिसांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांना या आधीच सगळी माहिती दिली आहे. मुलीच्या आत्महत्येवर उगाच राजकारण करू नये असे आवाहनही त्यांनी केले. राजकीय नेत्यांकडून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे आमच्या मुलीचा दररोज मृत्यू होत असल्याचे त्यांनी सांगितले. या सगळ्या प्रकरणात आम्हाला खूप त्रास होत असून आमच्याही मनात आत्महत्येचे विचार येत आहे आणि जीवाचं काही बरंवाईट झाल्यास आरोप नेत्यांना जबाबदार ठरवण्यात यावे असेही त्यांनी म्हटले. 


समाज म्हणून एकत्र या, महापौर किशोरी पेडणेकर यांचे आवाहन


सध्या सुरू असलेल्या आरोपांमुळे सालियन कुटुंबाचे नातेवाईक, मित्र परिवारदेखील त्यांच्याकडे येत नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. या प्रकरणाची चर्चा करणे थांबवायला हवी असेही त्यांनी सांगितले. समाज म्हणून कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. दिशाच्या आई-वडिलांनी महिला आयोगाला आणि मला पत्राद्वारे तक्रार अर्ज दिला आहे. या पत्रावर योग्य ती कारवाई करू असेही त्यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha