मुंबई :  दसरा मेळाव्याला (Dasara Melava) आता आवाज कुणाचा? यासाठी दोन्ही गटांनी तयारी सुरू केली आहे.  उच्च न्यायालयात ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती समोर आली आहे.


शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास 4 हजार 500 एसटी गाड्यांची मागणी


एबीपी माझाला मिळालेल्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी 300 एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास 4 हजार 500 गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती समोर आली आहे. तर  दसरा मेळाव्यासाठी हिंगोलीसाठी 200 खासगी बस जाणार आहेत. दसरा मेळाव्यासाठी एकूण 10-11 हजार कार्यकर्ते मुंबईला जाणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी हिंगोली मधून दहा ते अकरा  हजार लोक जाणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिली आहे. 


बीकेसी मैदानावर  एक लाख कार्यकर्त्यांची बसण्याची सोय


 बीकेसी मैदानावर देखील एक लाख कार्यकर्ते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच  दहा हजार गाड्यांची पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.  तसेच धुळे  जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्त्यांना घेऊन रेल्वेने जाण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती साक्रीच्या आमदार मंजुळा गावित यांचे पती डॉ.  तुळशीराम गावित यांनी दिली आहे. तसेच  गरज पडल्यास खाजगी वाहनांनी जाण्याचं नियोजन सुरू आहे म्हणाले. बोलेरो, किंवा क्रूझर यासारख्या गाड्यांची गरज पडल्यास तयारी करण्यात आली आहे. तर पुणे जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी खाजगी बसेस आणि इतर वाहने मिळून अंदाजे 500 गाड्यांतून कार्यकर्ते मुंबईला नेण्याच्या हालचाली सुरु आहेत. औरंगाबादचे पालकमंत्री तथा रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्या मतदारसंघातून तीनशे ते चारशे चारचाकी गाड्या दसरा मेळाव्यासाठी मुंबईत घेऊन जाण्याचे नियोजन केलं. 


दसरा मेळाव्याला बीकेसी एमएमआरडीए मैदानं कार्यकर्त्यांनी  भरवण्यासाठी दोन्ही गट तयारी करणार आहेत. कार्यकर्त्यांच्या या रेकॉर्ड ब्रेक गर्दीतूनच शिंदे गट आपली ताकद दाखवताना, शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहेत.  राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिंदे गटात सामील झालेला शिवसैनिक या दसरा मेळाव्याला हजर राहणार आहे.  . त्यामुळे 5 ऑक्टोबरला खऱ्या अर्थाने आवाज कुणाचा? हे पाहायला मिळेल.



संबंधित बातम्या :


Nilam Gorhe : 'आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच', निलम गोऱ्हे यांचा विश्वास


गौप्यस्फोट! 'दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी दिला होता मुख्यमंत्र्यांना सल्ला'