मुंबई : उच्च न्यायालयात (Bombay High Court)  ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर (Shivaji Park)  दसरा मेळावा (Dasara Melava)  करण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत असल्याची माहिती आहे


मुंबईतल्या विभागप्रमुखांची ताकद पणाला


मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून चार बसेस निघणार आहेत. मुंबईत एकूण 227 शाखा आहे म्हणजे एकूण 908 बस या मुंबईतल्याच असणार आहेत. मुंबईतून ठाकरेंना यंदा 50 हजारपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबईतल्या विभागप्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे.


प्रत्येक विभागप्रमुखाला दसरा मेळाव्याची जबाबदारी


मुंबईत शिवसेनेचे 12 विभागप्रमुख आहेत. प्रत्येक विभागप्रमुखाला दसरा मेळाव्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या सर्व विभागप्रमुखांवर शिवसेनेचे नेते काम करत आहेत. मुंबई व्यतिरिक्त ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड आणि नाशिकमधून मोठी गर्दी अपेक्षित आहे. मुंबईच्या बाहेरून साधारणतः 50 हजार कार्यकर्ते अपेक्षित आहेत. खासदार राजन विचारेंवर ठाण्यासह, मीरा भाईंदर आणि नवी मुंबईतल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.  


एकनाथ शिंदेच्या बंडानंतरचा हा पहिलाच मेळावा असल्यानं  पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून ट्रेननं  मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येणार आहेत. मेळाव्यासाठी हजारोंच्या संख्येनं येणा-या लोकांसाठी पाणी आणि जेवणाची पाकिटं आधीच खुर्च्यांवर ठेवलेली असतील. तसेच मोबाईल टॅायलेट्स अनेक गाड्या मैदानाच्या सुरुवातीला ठेवण्यात  येतील. शिवाजी पार्कच्या स्टेजवर शिवसेनेच्या नेत्यांनाच बसायचं स्थान दिलं जाणार आहे. किशोरी पेडणेकर, अरविंद सावंत, नितिन बानुगडे पाटील आदित्य ठाकरे यांची भाषण आधी होतील तसेच काही नविन चेह-यांना भाषणं करण्याची संधी मिळू शकते. त्यानंतर 7.30 वाजता उद्धव ठाकरे भाषणाला सुरुवात करणार आहेत. वाजत - गाजत -गुलाल - उधळत या! पण शिस्तीत या! असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या शिवसैनिकांना विचारांचं सोनं लुटण्यासाठी शिवसेनेचे परंपरा असलेल्या दसरा मेळाव्यासाठी निमंत्रित केलं आहे.  1966 सालापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेल्या दसरा मेळावा आज दोन गटात विभागला गेला आहे. ज्या दसरा मेळाव्याला विचारांचे सोनं लुटलं जायचं त्याच मेळाव्यात मोठ्या शक्ती प्रदर्शनाची  तयारी केली आहे. 


संबंधित बातम्या :


Nilam Gorhe : 'आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच', निलम गोऱ्हे यांचा विश्वास


गौप्यस्फोट! 'दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी दिला होता मुख्यमंत्र्यांना सल्ला'