Mumbai News : राज्यात नेहमीच मराठी (Marathi) भाषेच्या संवर्धनाचा मुद्दा ऐरणीवर असतो. महाराष्ट्रात मराठी बोलण्यासाठी, लिहिण्यासाठी प्राधान्य असायला हवं. परंतु असं असूनही शासन दरबारी तसंच इतर ठिकाणी मराठी भाषा वापरली जात नाही. त्यामुळे मराठी भाषा संवर्धनासाठी काम करणाऱ्या संघटना आणि मराठी लोक चिंता व्यक्त करत करतात. त्यातच ज्या देवीच्या नावावरुन या शहराला मुंबई (Mumbai) हे नाव मिळालं त्या मुंबादेवी (Mumbadevi) इथेच हिंदीचा वापर होत आहे. त्यावर मराठी एकीकरण समितीने (Marathi Ekikaran Samiti) आक्षेप घेतला आहे.


सध्या नवरात्र उत्सव सुरु आहे. या नवरात्र उत्सव काळात अनेक ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. यामध्ये मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या मुंबादेवी मंदिर परिसरात देखील नवरात्र उत्सव निमित्ताने अनेक बॅनर लावण्यात आलेले आहेत. हे बॅनर हिंदी भाषेत लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे या बॅनरवर मराठी एकीकरण समितीने आक्षेप घेतला आहे.


मुंबादेवी मंदिर प्रशासनाला हिंदीचा विळखा पाहायला मिळत आहे. ज्या एक भाषिक मुंबईसाठी प्राणांची आहुती दिली, आज त्या हुतात्म्यांना देखील लाजवेल अशी कृती सध्या मुंबईत सर्वत्र होताना दिसत आहे. भाषिक आक्रमण जोराने सुरु आहे. मुंबा-आई म्हणतो त्या भवानीच्या नावाने आपल्या शहराचे नाव आहे असे आपण म्हणतो, त्याच देवळाच्या विश्वस्त मंडळींना मराठी भाषा नकोशी झाली आहे. त्यामुळे मराठी भाषेचा वापर, कायदे, नियम फक्त कागदावरच का? अतिक्रमण केलेल्या इतर परकीय भाषेतील (हिंदी, गुजराती) फलक मंदिर समितीने उतरवून मराठी भाषेचा वापर करावा, अन्यथा मराठी एकीकरण समिती संघटनेला याठिकाणी आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी, महाराष्ट्र राज्य मराठी एकीकरण समितीचे दक्षिण मुंबई अध्यक्ष सचिन दाभोळकर
यांनी म्हटलं.


मराठी एकीकरण समितीने ज्या हिंदी बॅनरवर आक्षेप घेतला आहे, यासंदर्भात मुंबादेवी मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती घेऊन पुढे बोलू अशी प्रतिक्रिया दिली. मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी आणि भाषेच्या संवर्धनासाठी राज्यभर अनेक प्रयत्न केले जातात. मात्र तरीही अनेक ठिकाणी मराठी ऐवजी इतर भाषांचा पर्याय सर्रास वापरला जातो. हे महाराष्ट्रासारख्या या मराठी राज्यात चुकीचं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे. त्यामुळे राज्य सरकारने योग्य धोरण आखणे फार महत्त्वाचं आहे, असं मराठी भाषिक अभ्यासक सांगतात.