Dasara Melava: दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. दुसरीकडे शिंदे गट या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे बोलले जात. दरम्यान याचवेळी मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी दसरा मेळाव्यावरून मोठा गौप्यस्फोट केला आहे. दसरा मेळाव्याबाबत कोणीही राजकारण करू नये असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राज ठाकरेंनी दिला होता. तसेच दसरा मेळावा आणि शिवसेना हे एक समीकरण असून, त्यात आपण पडू नयेत असा सल्लाही राज ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना दिला होता असेही महाजन म्हणाले आहे.


यावेळी बोलतांना महाजन म्हणाले की, जेव्हा दसरा मेळाव्याचा विषय निघाला त्यावेळी आमच्या पक्षातील सुद्धा काही तरुण कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की, राज ठाकरेंनी सुद्धा दसरा मेळावा घ्यावा. विशेष म्हणजे राज ठाकरेंना हे सांगण्याची जवाबदारी त्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर टाकली. त्यामुळे याबाबत मी राज ठाकरे यांना विचारलं. तेव्हा यावर बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, वर्षोनुवर्षे दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क हे समीकरण घट्ट आहे. त्यामुळे या समीकरणात आपण जाणे म्हणजे कुंतेल पणाच लक्षण ठरेल. त्यामुळे हे समीकरण असेच राहिले पाहिजे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी मी फारसा उत्सुक नाही असे राज ठाकरे मला म्हणाले होते, असेही प्रकाश महाजन म्हणाले. तर असाच सल्ला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुद्धा दिल्याचं महाजन म्हणाले.


याचा शिवसेनेला फायदा...


मुंबई उच्च न्यायालयाने शिवसेनेला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी देण्यात आल्याच्या मुद्यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, या निकालाचा शिवसेनेला मोठा फायदा झाला आहे. कोर्टाच्या निकालानंतर शिवसेनेची सहानभूती वाढली आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यात आणखी गर्दी वाढणार असून, शिवसेनेला एक आधार मिळाला असल्याचं महाजन म्हणाले आहे.


तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा... 


एटीएसने पीएफआयच्या सदस्यांना अटक केल्याच्या विरोधात पुण्यात काढलेल्या मोर्च्यात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यावर बोलतांना प्रकाश महाजन म्हणाले की, पाकिस्तानच्या घोषणा देणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. देशावर प्रेम करणाऱ्या मुस्लिमांचा आम्ही आदर करतो, पण ज्यांना पाकिस्तानवर प्रेम आहे त्यांनी खुशाल तिकडे जावे. पीएफआय काय करते हे संपूर्ण जगाला माहित असून, अशी वृत्ती ठेसून काढली पाहिजे. तर आरएसएसने कधीही देशविरोधात कोणतेही गोष्ट केली नाही. त्यांनी नेहमी फक्त देशभक्तीच शिकवली असल्याचं महाजन म्हणाले.