एक्स्प्लोर
Advertisement
लग्नाच्या आहेराची रक्कम सैनिक फंडाला, डहाणूतील राजपूत कुटुंबीयांच्या निर्णयाचं कौतुक
आपण जो आनंद साजरा करतो, हा सैनिकांमुळे असून त्यांच्याकरिता काही केले पाहिजे, या भावनेतून विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला द्यायचा विचार त्यांच्या मनात आला.
पालघर : पुलवामा येथील दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात भारताचे चाळीस जवान शहीद झाले. त्यानंतर संपूर्ण देशभर हळहळ आणि पाकिस्तानविषयी द्वेष भावना निर्माण झाली. दरम्यान आपल्या सुख:करिता देहाची बाजी लावणार्या सैनिकांकरीता मुलीच्या लग्नातील आहेराची सर्व धनराशीच देण्याचा निर्णय डहाणू शहरातील सरावली येथल्या अशोक ओघडभाई राजपूत आणि कुटुंबियांनी घेतला आहे. त्यांच्या या देशप्रेमाविषयी सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राजपूत कुटुंबीय सरावली मानफोडपाडा येथील रहिवासी आहेत. अशोक हे एका कंपनीत व्यवस्थापक पदावर आहेत. त्यांची थोरली मुलगी भावना (वय 25 वर्ष) हिचा विवाह सेलवासाच्या कोडिणार गावातील वालजीभाई जेठवा यांच्या इंजिनीअर मुलगा केतुल (वय 26 वर्ष) यांच्याशी 24 फेब्रुवारी रोजी ठरला. लगीनघाई सुरु असताना 14 फेब्रुवारी रोजी पुलावामा येथील दहशतवादी हल्यात चाळीस भारतीय जवान शहीद झाल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण देशभर शोककळा पसरली. लग्नकार्याच्या तोंडावर हे घडल्याने राजपूत कुटुंबीय हेलावून गेले. समाजात आणि माध्यमांमध्ये शहीद आणि त्यांच्या कुटुंबियांविषयी ऐकताना मन कष्टी बनायचे अशा आठवणी अशोक राजपूत यांनी बोलताना सांगितल्या.
आपण जो आनंद साजरा करतो, हा सैनिकांमुळे असून त्यांच्याकरिता काही केले पाहिजे, या भावनेतून विवाह सोहळ्यात जमा होणारी धनराशी सैनिक रिलीफ फंडाला द्यायचा विचार त्यांच्या मनात आला. हा विचार त्यांनी पत्नी सुधा, आई मंगुबाई, मुलगी भावना आणि स्नेहल आणि मुलगा स्वप्नील यांना सांगितला. त्यानंतर नवर्याकडील मंडळींना कळवलं. या सर्वांनी त्याचे स्वागत केले. त्यानंतर 24 फेब्रुवारी रोजी उभयंत्यांचा विवाह सोहळा पार पडला. किंबहुना राजपूत कुटुंबियांनी घेतलेल्या निर्णयाची माहिती शहरातील नागरिकांनाही कळली त्यांनी या कुटुंबियांची पाठ थोपटली.
दरम्यान या लग्नात आहेर देणार्या प्रत्येकाच्या नावाची नोंद एका रजिस्टरवर केली असून त्या समोर रक्कमही नोंदविण्यात येणार आहे. या यादीसह संपूर्ण धनराशी पालघर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सैनिक रिलीफ फंडाला धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात येईल असे राजपूत म्हणाले. माझ्या या निर्णयात कुटुंबिय आणि मित्र परिवाराचा महत्त्वाचा वाटा आहे. त्यांनाही या माध्यमातून देशसेवेत खारीचा वाटा उचलल्याचे समाधान मिळेल हा उदात्त हेतू त्यांनी बोलून दाखवला. किमान दीड लाख रुपयांचा आहेर येणे अपेक्षित आहे. जरी 2 किंवा 3 लाखांच्या घरात रक्कम गेली, तरीही पै अन् पै सैनिकांच्या नावेच जमा केली जाईल, अशी पुष्टीही त्यांनी जोडली. हा अनोखा विवाहसोहळा चर्चेचा विषय बनला असून राजपूत कुटुंबियांचे सर्वच स्तरावर अभिनंदन होत आहे.
"केवळ सैनिकांमुळेच भारतीय नागरिक सुरक्षित आहेत, या भावनेतून आहेराची धनराशी सैनिक फंडाला देण्याचा निर्णय कुटुंबीयांच्या चर्चेनंतर घेतला. लग्नानंतरचे काही रिती-रिवाज अद्याप बाकी आहेत. ते पूर्ण झाल्यानंतर आहेर देणार्यांची नावं आणि रक्कम असलेली यादी आणि धनराशी जिल्हाधिकार्यांमार्फत इंडियन आर्मी रिलीफ फंड मध्ये जमा केली जाईल," अशी माहिती वधूचे वडील अशोक राजपूत यांनी दिली.
"डहाणूतील राजपूत कुटुंबीयांनी सैनिकांविषयी दाखवलेल्या भावना आदर्शवत आहेत. या शहरातील नागरिक सुजाण असल्याचे हे उत्तम उदाहरण असून त्याचे अनुकरण झाले पाहिजे," असं डहाणूचे प्रांताधिकारी सौरभ कटियार म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
बॉलीवूड
निवडणूक
सोलापूर
Advertisement