(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईतील प्रसिद्ध रेस्टॉरंट व क्लबवर धाडी, मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेची धडक कारवाई
मुंबई महापालिकेनं कोरोना नियमावली जारी केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी महापालिकेच्या आदेशाचं पालन होत नसल्याचं समोर येत असून गुन्हे शाखेने रेस्टॉरंट आणि क्लबवर अचानक धाडी टाकल्या.
मुंबई : मुंबईच्या नव्या आयुक्तांनी पदभार स्वीकारताच ते अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे.गुन्हे शाखेतील तब्बल 65 अधिकाऱ्यांच्या एकाच दिवशी बदली केल्यानंतर काल रात्री मुंबईच्या विविध भागात गुन्हे शाखेने बार आणि रेस्टॉरंटवर धडक कारवाई केली. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यानं मुंबई महापालिकेनं कोरोना नियमावली जारी केली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्लबसाठीही नियम ठरवून देण्यात आले आहे. मात्र, अनेक ठिकाणी महापालिकेच्या आदेशाचं पालन होत नसल्याचं समोर येत असून गुन्हे शाखेने रेस्टॉरंट आणि क्लबवर अचानक धाडी टाकल्या.
मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेची तब्बल 24 पथके यासाठी तयार करण्यात आली होती. त्यांनी दक्षिण मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या प्रसिद्ध बारवर छापा टाकून कारवाई केली. दक्षिण मुंबईमधील गोल्डन गुज या ग्रांट रोड येथील बारमधून 6 महिला 15 पुरुष, व्हाईट हाऊस या ताडदेव येथील बार मधून 8 महिला 48 पुरुष तर त्रिवेणी या कुर्ला येथील बारमधून 6 महिला आणि 38 पुरुषांवर गुन्हे दाखल करीत कारवाई करण्यात आली आहे.
या कारावाईत बारमध्ये गाणे गाणाऱ्या महिला, कर्मचारी आणि ग्राहक यांचा समावेश आहे. पहाटेपर्यंत मुंबई शहरातील 9 ते 10 बारवर पोलिसांनी छापा टाकल्याची माहिती समोर येत आहे.