मध्य रेल्वेला जाग, विशेष लोकलच्या फेऱ्यांमध्ये वाढ!
मध्य रेल्वेने त्यांच्या विशेष लोकलच्या फेऱ्या 355 वरुन 423 फेऱ्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 24 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून 68 अधिकच्या फेऱ्या मध्य रेल्वे चालवणार आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु केलेल्या विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवल्यानंतर आता मध्य रेल्वेला देखील जाग आली आहे. मध्य रेल्वेने त्यांच्या विशेष लोकलच्या फेऱ्या 355 वरुन 423 फेऱ्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 24 सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून 68 अधिकच्या फेऱ्या मध्य रेल्वे चालवणार आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळे रोज गर्दीतून प्रवास करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेसह मध्य रेल्वेलाही आपल्या विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची आता गरज पडली आहे. उशिरा का होईना पण मध्य रेल्वेने विशेष लोकलच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय आज जाहीर केला. एकूण 68 अधिकच्या फेऱ्या आजपासून चालवल्या जातील. या 68 पैकी 46 फेऱ्या या मध्य रेल्वेवर तर 22 फेऱ्या हार्बर रेल्वेवर वाढवण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे वरील अधिकच्या फेऱ्यांमध्ये कसारा ते सीएसएमटी दरम्यान 9, कल्याण ते कसारा दरम्यान 6, कर्जत ते सीएसएमटी दरम्यान 9, ठाणे ते कर्जत दरम्यान 2, कल्याण ते कर्जत दरम्यान 2, अंबरनाथ ते सीएसएमटी दरम्यान 3, कल्याण ते सीएसएमटी दरम्यान 5, ठाणे ते सीएसएमटी दरम्यान 4 तर कुर्ला ते सीएसएमटी दरम्यान 6 फेऱ्या वाढवण्यात आल्या आहेत. तर हार्बर मार्गावर एकूण बावीस फेऱ्या वाढवल्या आहेत. यामध्ये पनवेल ते सीएसएमटी दरम्यान 14 तर वाशी ते सीएसएमटी दरम्यान 8 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे ते वाशी दरम्यान आधीच 2 लोकलच्या फेऱ्या चालवल्या जात आहेत.
अतिरिक्त 68 सेवा (मुख्य मार्गिकेवर 46 आणि हार्बर मार्गावर 22 सेवा)
9 सेवा (5 डाऊन आणि 4 अप) कसारा-सीएसएमटी 6 सेवा (3 डाऊ 3 अप) कसारा-कल्याण/ 9 सेवा (4 डाऊन 5 अप) कर्जत-सीएसएमटी 2 सेवा (1 डाऊन 1 अप) ठाणे-कर्जत 2 सेवा (1 डाऊन 1 अप) कल्याण-कर्जत 3 सेवा (2 डाऊन 1 अप) अंबरनाथ-सीएसएमटी 5 सेवा (2 डाऊन 3 अप) कल्याण-सीएसएमटी 4 सेवा (2 डाऊन 2 अप) ठाणे-सीएसएमटी 6 सेवा (3 डाऊन 3 अप) कुर्ला-सीएसएमटी 14 सेवा (8 डाऊन 6 अप) पनवेल-सीएसएमटी 8 सेवा (3 डाऊन 5 अप) वाशी-ठाणे
या सर्व फेऱ्या मिळून दरदिवशी मध्य रेल्वेवर 329, हार्बर रेल्वे वर 92 तर ट्रान्स हार्बर मार्गावर 2 लोकल चालवल्या जातील. यामध्ये सर्वाधिक 82 फेऱ्या कल्याण ते सीएसएमटी दरम्यान चालवण्यात येणार आहेत. त्यानंतर ठाणे स्थानकातून सर्वाधिक 72 लोकल चालवल्या जातील. तर हार्बर मार्गावर पनवेल स्थानकातून सर्वाधिक 84 लोकल चालवल्या जातील.
एकूण 423 सेवा (मुख्य मार्गिका 329, हार्बर लाईन 92, ट्रान्स हार्बर 02)
72 सेवा (37 डाऊन 35 अप) ठाणे-सीएसएमटी 24 सेवा (11 डाऊन 13 अप) डोंबिवली-सीएसएमटी 14 सेवा (7 डाऊन 7 अप) कुर्ला-सीएसएमटी 82 सेवा (41 डाऊन 41 अप) कल्याण-सीएसएमटी 20 सेवा (10 डाऊन 10 अप) टिटवाळा-सीएसएमटी 41 सेवा (21 डाऊन 20 अप) कसारा-सीएसएमटी 45 सेवा (22 डाऊन 23 अप) कर्जत-सीएसएमटी 24 सेवा (12 डाऊन 12 अप) बदलापूर-सीएसएमटी 07 सेवा (4 डाऊन 3 अप) अंबरनाथ-सीएसएमटी 84 सेवा (43 डाऊन 41अप) पनवेल-सीएसएमटी 08 सेवा (3 डाऊन 5 अप) वाशी-सीएसएमटी
ट्रान्स हार्बर मार्गावर दोन सेवा (1 डाऊन 1 अप) वाशी
राज्य सरकारच्या विनंतीवरुन 15 जून पासून लोकल सुरू करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला. सुरुवातीला अगदी मोजक्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलमध्ये परवानगी देण्यात आली होती. मात्र त्यानंतर या यादीमध्ये वाढ करून विविध क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश करण्यात आला. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या विशेष लोकलमध्ये गर्दी वाढून एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखता येत नव्हते. त्यामुळे covid-19 चा प्रसार वाढण्याची भीती निर्माण झाली होती. याचा विचार करून सुरुवातीला पश्चिम रेल्वे आणि आता मध्य रेल्वेने देखील विशेष लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पश्चिम रेल्वेच्या 500 आणि मध्य रेल्वेच्या 423 अशा एकूण 923 विशेष लोकल मुंबईत चालवल्या जातील ज्याचा फायदा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना होईल.
मध्य रेल्वेच्या विशेष उपनगरीय गाड्यांची आणि स्थानकांची नियमितपणे स्वच्छता केली जाते, असं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. सरकारने परवानगी दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी रेल्वे स्थानकांवर आणि विशेष उपनगरीय लोकलमधून प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं आणि मास्क वापरावा, असं आवाहन मध्य रेल्वेने केलं आहे.























