Exclusive | दिवाळीतली मोठी गूड न्यूज, सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात
दिवाळीपूर्वीच मोठी खुशखबर हाती आली आहे. सिरम इन्स्टिट्युटची कोरोना संसर्गावरील कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आली आहे.
मुंबई : दिवाळीतली सर्वात मोठी गूड न्यूज हाती आली आहे. सिरम इन्स्टिट्युटची कोविशील्ड लसीची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. अंतिम टप्प्यातही ही लस पास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या महिन्याअखेरपर्यंत कोविशील्ड लसीची चाचणी पूर्ण होईल. त्यामुळे कोरोना संसर्गावरील लस लवकरचं उपलब्ध होणार आहे.
सिरम इन्स्टिट्यूटनं बनवलेल्या कोविशील्ड लशीच्या चाचणीचे परिणाम सकारात्मक येत आहेत. मुंबईत कोविशील्ड लस दिलेल्यांपैकी कुणालाही साईड इफेक्ट दिसलेले नाहीत. मुंबईतल्या नायर आणि केईएम रूग्णालयात सुरू असलेल्या कोविशील्ड लसीची आतापर्यंतची वाटचाल यशस्वी राहिली आहे. या लसीचा पहिला डोस देवून एक महिना उलटल्यानंतरही एकाही व्यक्तीला कोणतेही साईड इफेक्ट किंवा शारिरिक त्रास झालेला नाही.
WHO अध्यक्षांकडून मोदींचे आभार, कोरोना लसीबाबत घेतलेल्या भूमिकेचे कौतुक
या लसीचा दुसरा डोसही आता अंतीम टप्प्यात आहे. नायर आणि केईएम या दोन रुग्णालयांमध्ये 248 जणांना ही लस दिली होती. तसंच सायन रुग्णालयातही भारत बायोटेकच्या कोवॅक्सीन लशीची चाचणी येत्या आठवड्यात सुरू होणार आहे. सायनमध्ये 1 हजार जणांवर कोवॅक्सीन लशीची चाचणी होणार आहे, अशी माहिती नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली आहे.
Pfizer कंपनीची लस 90 टक्के प्रभावी
Pfizer या औषध कंपनीने विकसित केलेली कोरोना संसर्गावरील लस 90 टक्के प्रभावी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. फिजर (Pfizer) आणि जर्मन बायोटेक्नॉलॉजी फर्म BioTech यांनी ही लस विकसित केली आहे. ज्यांना कोरोनाची लक्षणे आधी दिसत नव्हती त्यांच्यावर ही लस प्रभावी ठरली आहे, असं कंपनीने म्हटलं आहे. Pfizer कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बोरला म्हणाले की, तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये आमच्या लसीची कोविड 19 संसर्ग रोखण्याची क्षमता दिसली आहे.
COVID VACCINE | कोरोना व्हायरस लस 90 टक्क्यांहून अधिक प्रभावी, Pfizer कंपनीचा दावा