दिलासादायक! मुंबईत कोरोना रुग्णवाढ दुपटीचा वेग 722 दिवसांवर
मुंबईत कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून रुग्णवाढ दुपटीचा वेग 722 दिवसांवर गेला आहे.
Mumbai Corona Update : मुंबईत कोरोना संसर्गाची दुसरी लाट हळूहळू ओसरताना दिसत आहे. कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेला आहे. आज मुंबईत कोरोनाचे 570 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर आज 742 रुग्ण बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोनामुळे आज 10 रुग्णांचा मृत्यू झाले असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.
मुंबईतील कोरोनाचं प्रमाण काही दिवसांपासून कमी होताना दिसत आहे. काही दिवसांपासून मुंबईत एक हजाराच्या खाली रुग्णसंख्या आल्याचं दिसून येत आहे. आज दिवसभरात 32 हजार 307 कोरोना चाणण्या करण्यात आल्यानंतर 742 जण संक्रमित आढळले आहेत. सध्या शहरात 14 हजार 453 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रिकव्हरी रेट आता 95 टक्के इतका झाला आहे. 15 जून ते 21 दरम्यान कोरोनाचा ग्रोथ रेट हा 0.09 टक्के इतका आहे. दिलासादायक म्हणजे कोरोना रुग्णसंख्येचा डबलिंग रेट हा 722 दिवसांवर गेलाय. मुंबईत सध्या 11 कंटेनमेंट झोन आहेत.
मुंबईत लसीकरणावर देखील जोर
मुंबईत लसीकरणावर देखील जोर दिला जात आहे. लसीकरणाबाबत महत्वाची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश ककाणी यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत सध्या लसपुरवठा चांगला आहे. जून महिन्यात जवळपास 6 लाखांपेक्षा अधिक लसपुरवठा झाला आहे. प्रत्येक सेंटरवर 300 लसी दिल्या जात आहेत, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, मुंबईत गर्दीचं नियोजन करता यावं याकरता 18 ते 44 वयोगटामध्ये दोन उपगट करण्यात आलेत. यांपैकी राज्याच्या संमतीनं 30 ते 44 च्या वयोगटाचं लसीकरण सुरु झालं आहे. मुंबईत 18 ते 44 वयोगटात 50 लाख लोकसंख्या आहे. पुढचा एक आठवडा 2 उपगटांनुसार लसीकरण प्रक्रीयेचा अभ्यास करणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा नवं नियोजन करणार आहोत, असं ककाणी यांनी सांगितलं.
ककाणी यांनी सांगितलं की, गेल्या 3 महिन्यांत एप्रिल- 8 लाख 70 हजार, मे- 4 लाख 57 हजार, जून- आतापर्यंत 6 लाखांपेक्षा जास्त मुंबईला लसपुरवठा झाला आहे. 75 % लससाठ्यावर केंद्राचं नियंत्रण आहे. ज्याकडून मुंबई महापालिकेला लस साठा मिळतो. लस साठा वाढल्यास अधिक लस केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, असं ते म्हणाले. कांदिवलीतील बनावट लसीकरण प्रकरणाबाबत ते म्हणाले की, यासंदर्भात सीरम इन्स्टिट्युटला महापालिकेकडून बॅच क्रमांकांच्या तपासणीबाबत पत्र दिले होते. सीरमकडून उद्यापर्यंत प्रतिसाद अपेक्षित आहे. पोलिस तपास या प्रतिसादानुसार केला जाऊ शकेल, असं ककाणी यांनी सांगितलं.