मुंबईतील नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष तपासणी, अतिरिक्त आयुक्तांचे आदेश
मुंबई महापालिकेचे नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष तपासणी करण्याचे बीएमसी अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी आदेश काढले आहेत. यावर आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी फक्त नगरसेवक नव्हे तर संपूर्ण मुंबईकरांची चाचणी करण्याची मागणी केली आहे.
मुंबई : मुंबईत कोरोना व्हायरसचे शेकडो रुग्ण रोज आढळत आहेत. आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा मुंबईला कोरोनामुक्त करण्यासाठी रात्रंदिवस काम करत आहे. मात्र अजूनही मुंबईकरांची तपासणी घरोघरी जाऊन केली जात नाही. मात्र एकीकडे मुंबईकरांची घरोघरी जाऊन तपासणी न करणारी मुंबई महापालिका आता नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांची विशेष तपासणी करणार आहे. मुंबईचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी तसे आदेश काढले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी फक्त नगरसेवक नव्हे तर संपूर्ण मुंबईकरांची चाचणी करण्याची मागणी केली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्य सचिव अजोय मेहता यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी नगरसेवक आणि कुटुंबियांची स्वॅब तपासणीसाठी आदेश जारी केले आहेत. तसेच ही तपासणी खाजगी लॅबतर्फे करण्यात येणार आहे. मुंबईकर, अभियंता, सफाई कर्मचारी, रुग्णालयात सेवा देणारे डॉक्टर आणि परिचारिका यांची अशा पद्धतीने तपासणी का नाही? असा सवाल अनिल गलगली यांनी उपस्थित केला आहे.
मुंबई महापालिकेचा हा दुजाभाव असल्याचा आरोप करत अनिल गलगली हा प्रकार लक्षात आणून दिला. स्वतः आयुक्तांनी लक्षणे नसल्यास कुठल्याही प्रकारची तपासणी न करण्याचे सांगितले असताना हे वेगळे आदेश का काढले जात आहेत. अनिल गलगली यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे आणि करायची असेल तर सर्व मुंबईकरांची चाचणी करा, असंही नमूद केलं आहे.
संबंधित बातम्या
- Lockdown 3.0 | देशात तिसऱ्या लॉकडाऊनची घोषणा; 17 मे पर्यंत राहणार चालू
- लॉकडाऊन किती दिवस वाढवणार? कोरोना असा संपणार नाही : राज ठाकरे
- यंदा शाळांनी फी वाढ करु नये, शिक्षण विभाग लवकरच निर्णय जारी करणार