संविधान, ज्ञानाचा दिवा लावून आंबेडकर आणि फुले जयंती साजरी करा : शरद पवार
'एक दिवा ज्ञानाचा' लावून फुले जयंती, 'एक दिवा संविधानासाठी' लावून आंबेडकर जयंती साजरी करा :
मुंबई : 'एक दिवा ज्ञानाचा' लावून फुले जयंती आणि 'एक दिवा संविधानासाठी' लावून आंबेडकर जयंती साजरी करा, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमात जे घडलं ते महाराष्ट्रात घडू नये यासाठी शरद पवार यांनी हे आवाहन केलं. शरद पवार फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला.
आणखी आठ दिवस सूचनांचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे. काळजी घेतली तर आपण निश्चितच कोरोनावर मात करु. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य कर्मचारी प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करत आहेत. सगळ्या जातीधर्मांनी एकत्र राहण्याची गरज आहे, असंही शरद पवार म्हणाले.
यंदा घरातच जयंती साजरी करा येत्या काही दिवसात शब ए बारात, महात्मा फुले जयंती आणि आंबेडकर जयंती आहे. परंतु यंदा जयंती उत्सवात गर्दी करु नका असं आवाहन शरद पवार यांनी केवं आहे. ते म्हणाले की, "आज महावीर जयंती आहे. मला खात्री आहे की संबंधित नागरिक कोरोनाची परिस्थिती पाहून आपल्या कुटुंबासह घरातच भगवान महावीरांबद्दल आदर व्यक्त करत असतील. असाच कार्यक्रम 8 एप्रिलला होणार आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की यंदाच्या शब ए बारातला तुम्ही घरातच थांबा. हयात नसलेल्यांना घरातच स्मरण करा. त्यानंतर 11 एप्रिलला महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा संदेश दिला. त्यामुळे यंदा फुलेंची जयंती ही 'एक दिवा ज्ञानाचा' लावून साजरी करा. 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. यावर्षी आपण 'एक दिवस संविधानासाठी' लावून जयंती साजरी करुया."
व्हॉट्सअॅपवरील पाचपैकी चार मेसेज खोटे सामाजिक माध्यमांतून समाजात तेढ निर्माण होणारे मेसेज पसरत असल्याचं शरद पवार म्हणाले. त्यांनी सांगितलं की, "कटुता, तणाव, संशय वाढेल अशी परिस्थिती येऊ देता कामा नये. व्हॉट्सअॅपवरील मेसेज काळजी करण्यासारखे आहेत. पाचपैकी चार मेसेज खोटे असतात, त्यामधून संभ्रम निर्माण केले जातात, गैरसमज पसरवले जात आहेत." तसंच दिल्लीत जे घडलं ते रोज रोज टीव्हीवर दाखवण्याची गरज आहे का, असा प्रश्न शरद पवार यांनी उपस्थित केला.
दिल्लीत खबरदारी घेतली असती तर... दिल्लीतील कार्यक्रम आयोजित करायला नको होता. कार्यक्रमाला परवानगी घेण्याची आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रातही धार्मिक कार्यक्रमाची विनंती करण्यात आली होती. परंतु राज्याच्या गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांनी अशा कार्यक्रमांना वेळीच परवानगी नाकारली. दिल्लीत अशीच खबरदारी घेतली असती तर हा सध्याची परिस्थिती ओढावली नसती आणि सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याची संधी मिळाली नसती.
तब्लिगी जमातच्या कार्यक्रमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढली : आरोग्य मंत्रालय 30 मार्चपर्यंत देशात कोरोनाबाधितांची संख्या 1251 होती आणि 32 जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांच्या माहितीनुसार, "COVID-19 रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा सध्याचा काळ 4.1 दिवस इतका आहे. मात्र मागील महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये तब्लिगी जमातचा कार्यक्रम झाला नसता तर हा काळ 7.4 दिवस इतका असता." म्हणजेच सात दिवसांऐवजी चार दिवसातच रुग्ण दुप्पट होऊ लागले आहेत.