मुंबईत अडकलेल्या कष्टकरी, कामगारांना बीएमसीकडून विनामूल्य जेवणाचा पुरवठा
मुंबईत अडकून पडलेल्या गरजूंना, कष्टकरी कामगारांना आणि गरीबांना बीएमसीच्या वतीने जेवण पुरवलं जात आहे. ज्यांना गरज आहे अशांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-221292 वर संपर्क साधल्यास मदत पुरवली जाईल, असं महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी सांगितलं.
मुंबई : कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या लागू असलेल्या लॉकाडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या विस्थापित, कष्टकरी कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या निर्देशाने व सहकार्याने मुबंई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व 24 विभागांमध्ये मिळून 734 मोफत जेवण वाटप केंद्र सुरु केली आहेत. त्या माध्यमातून दररोज दोनवेळची मिळून सुमारे 4 लाख 61 हजार इतकी तयार जेवणाची पाकिटं गरजूंना विनामूल्य पुरवली जात आहेत. दरम्यान, आवश्यकता असल्यास संबंधितांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-221292 यावर संपर्क साधावा, त्यानुसार त्यांना मदत पुरवली जाईल, असं आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी केलं आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक उपाययोजना मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या समाजघटकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने कामे केली जात आहेत. मुंबईमध्ये मोठ्या संख्येने कामगार, मजूर, विस्थापित वास्तव्यास आहेत. या विस्थापित व कष्टकरी तसेच लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या गरजू व्यक्तींसाठी दोनवेळचे तयार जेवण पुरवण्याचे काम 28 मार्चपासून सातत्याने केले जात आहे. मुंबईतील विविध लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, संबंधित स्थानिक नगरसेवक यांच्या सहकार्याने समन्वय साधून अन्नाचे वितरण करण्यात येत आहे.
या वितरण केंद्रांच्या माध्यमातून सुरुवातीला रस्त्यावर राहणाऱ्या, बेघर व्यक्तींना जेवण देण्यात येत होते. विस्थापित व कष्टकरी, कामगार, मजूर अशा सगळ्यांची गरज लक्षात घेता या कामाची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. सध्या दोनवेळची मिळून सुमारे 4 लाख 61 हजार 100 इतकी तयार जेवणाची पाकिटे विनामूल्य पुरवली जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या कम्युनिटी किचन्सच्या माध्यमातून जेवण तयार केले जाते. बेस्ट प्रशासनाच्या 48 वातानुकूलित बसेसद्वारे मुंबईतील 24 विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात एकूण 734 केंद्रांवर हे जेवण पोहोचवले जाते. दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत अशा दोनवेळेस सर्व गरजूंना विनामूल्य तयार जेवण पुरवले जात आहे. या सर्व कामांमध्ये बिगर शासकीय संस्था, सेवाभावी संस्था व व्यक्ती, बचतगट यांचेही सहकार्य मिळत आहे.