coronavirus | बीएमसी आरोग्य कर्मचारी, पोलिसांसाठी वांद्र्यातील गुरुनानक हॉस्पिटल आरक्षित
गुरुनानक हॉस्पिटलमध्ये सध्या 99 बेड, 11 व्हेंटिलेटर, 22 आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे. मुंबई महापालिका कर्मचारी आणि पोलीस हे अत्यावश्यक सेवेत येतात, त्याच्यासाठी हे हॉस्पिटल आरक्षित ठेवण्यात आलं आहे.
मुंबई : मुंबईसह देशभरात कोरोना व्हायरसचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत तर कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चिंता वाढवणारा आहे. कोरोना व्हायरसच्या या गंभीर परिस्थितीत आरोग्य विभागातील कर्मचारी आणि पोलीस महत्त्वाची भूमिका निभावत आहेत. त्यामुळेच आपलं कर्तव्य बजावत असताना मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी आणि पोलीस यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांच्या उपचारासाठी वांद्रे येथील गुरुनानक हॉस्पिटल आरक्षित ठेवण्यात येणार आहे.
गुरुनानक हॉस्पिटलमध्ये सध्या 99 बेड, 11 व्हेंटिलेटर, 22 आयसीयू बेड्सची व्यवस्था आहे. मुंबई महापालिका कर्मचारी आणि पोलीस हे अत्यावश्यक सेवेत येतात. त्यामुळे काम करत असताना त्यांना कोरोनाची बाधा झाल्यास त्यांच्यासाठी हे रुग्णालय आरक्षित ठेवण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना योग्य उपचार मिळावेत. मुंबई महापालिकेने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.
सध्या महापालिकेच्या अनेक रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोराना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका रुग्णालयातील नर्सेस, वॉर्ड बॉय आणि आरोग्य सेवा देणाऱ्यांना आहे. तसेच पोलीस कर्मचारीही दिवसरात्र आपलं कर्तव्य बजावत घराबाहेर आहेत. त्यामुळे योग्य सुविधा मिळावी यासाठी मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे.
संबंधित बातम्या