मुंबई : कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे दक्षतेपोटी नागरिक मास्क आणि सॅनिटायझरची खरेदी करत आहेत. मात्र मेडिकल शॉपीमधून मास्क पाठोपाठ आता सॅनिटायझर सुद्धा गायब झालेले आहे. नागरिकांना हव्या असणाऱ्या छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे कारण सांगत त्याऐवजी मोठ्या आणि 600 रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे.


चीनमधून संपूर्ण जगभरामध्ये कोरोना व्हायरस दाखल झालेला आहे. आता महाराष्ट्रात ही कोरोना रुग्ण आढळत असल्यामुळे या व्हायरसची लागण आपल्याला होऊ नये म्हणून नागरिक मेडिकल शॉपमध्ये जाऊन मास्क बरोबरच सॅनिटायझरची मागणी करत आहेत. मात्र मेडिकल मधूनच मास्क पाठोपाठ सॅनिटायझर गायब झाले आहेत. अचानक सॅनिटायझरची मागणी वाढल्यामुळे आणि भीतीपोटी प्रत्येकाने एकाऐवजी तीन ते चार सॅनिटायझरच्या बॉटल्स खरेदी केल्यामुळे सध्या मेडिकल शॉप्समध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.

#CoronaVirus | महाराष्ट्रातील 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत, अधिकची काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सॅनिटायझरचे वेगवेगळ्या ब्रॅन्ड सध्या बाजारात उपलब्ध होते. मात्र त्यांची मागणी वाढल्यामुळे या ब्रँडचा पुरवठा कमी झालेला आहे. उत्पादकांनी माल पाठवला नाही तर आम्ही ग्राहकांना द्यायचं कुठून? असं मेडिकल शॉप्स चालकांचं म्हणणं आहे. आम्ही उत्पादकांकडे दररोज मागणी करत आहोत. मात्र मुबलक युनिट्स आमच्याकडे येत नसल्यामुळे आम्ही ग्राहकांपर्यंत ते पोहोचवू शकत नसल्याचं मेडिकल शॉपच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

#CoronaVirus | कोरोनाचा धसका, तुकाराम बीजेवर सावट, प्रसिद्ध येरमाळासह राज्यातील अनेक यात्रा, कार्यक्रम रद्द

मुंबईमध्ये प्रत्येक आठवड्याला 2 लाख सॅनिटायझरचे युनिट ( छोटी बॉटल) चा पुरवठा होत असे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझरची खरेदी केल्यामुळे सध्या मुंबईतील अनेक मेडिकल शॉपमध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. आता एक आठवड्याला तब्बल पंधरा लाख युनिटची मागणी होत आहे. मात्र ब्रँडेड कंपन्यांकडून हा पुरवठा वेळेत करणं शक्य नसल्यामुळे सध्या मेडिकल शॉप्समध्ये हे सॅनिटायझर उपलब्ध नाहीत. महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने सॅनिटायझर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना अधिक सॅनिटायझरचे युनिट उत्पादन करून ते बाजारात उपलब्ध करून देण्याची विनंतीही केलेली आहे.

मेडिकल शॉप्समध्ये सध्या नागरिकांना हव्या असणाऱ्या छोट्या बॉटल्स उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र त्याऐवजी मोठ्या आणि 500 रुपयांहून अधिक किमतीच्या बॉटल्स ग्राहकांच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्नही काही ठिकाणी होत आहे. आता अशा परिस्थितीमध्ये राज्य शासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांना सॅनिटायझर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी होताना दिसत आहे.

Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा

गेल्या पंधरा दिवसांपासून सॅनिटायझरची मागणी वाढलेली आहे. या मध्ये ब्रँडेड कंपनीच्या सॅनिटायझरला जास्त मागणी आहे. आमच्याकडे जो माल उपलब्ध होता, तो सर्व आम्ही ग्राहकांना दिलेला आहे. मात्र उत्पादकांकडून अजून माल मिळत नसल्यामुळे सध्या आमच्याकडेही दुसरा पर्याय उपलब्ध नाही. आम्ही या कंपन्यांकडे मालाची मागणी करतोय , मात्र आम्हाला तितकासा प्रतिसाद मिळत नाही, अशी प्रतिक्रिया मेडिकल चालक श्रीधर पाटील यांनी दिली आहे.

Coronavirus | जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोना व्हायरस महामारी म्हणून घोषित

महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे प्रसाद दानवे म्हणाले की, सॅनिटायझरच्या छोट्या बाटल्या जरी मेडिकल मध्ये उपलब्ध नसल्या तरी मोठ्या बाटल्या विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना सहज वापरता याव्यात आणि आपल्याजवळ ठेवता याव्यात अशा छोट्या बाटल्या उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. सॅनिटायझर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत आम्ही बातचीत ही केलेली आहे. त्यांच्याकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसाद आहे. फक्त नागरिकांनी घाबरून न जाता थोडा धीर धरुन संयम बाळगावा अशी आमची त्यांना विनंती आहे.