मुंबई : पुण्यातील कोरोना बाधित दाम्पत्य दुबईला फिरायले गेले होते. त्यांच्यासोबत आणखी काही पर्यटकही होते. त्यामुळे या सर्व पर्यटकांना कोरोनाची लागण झाली आहे का? याची तपासणी होणेही गरजेची आहे. या दाम्पत्याचे कोरोनाचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचा शोध सुरु केला होता. प्रामुख्याने त्यांच्यासोबत दुबईला गेलेल्या पर्यटकांचा शोध सुरु केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्यासोबत अहमदनगरचे 4, बीडचे 3, पिंपरी-चिंचवडचे 3, पुण्याचे 5, ठाण्याचा 1, मुंबईतले 6, यवतमाळचे 10, नागपूरचे 3, रायगडचे 2 असे एकूण 37 जण होते. या सर्वांची कोरोनाची तपासणी केली जाणार आहे. या सर्वांना घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य जिल्हा प्रशासन या सर्वांवर विशेष लक्ष ठेऊन आहे.
या दाम्पत्याची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या दोघांनी मुंबई-पुणे प्रवास केला, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तिघेही कोरोना बाधित आढळले आहेत. या सर्वांचा नायडू रुग्णालयात उपचार सुरु आहे. ड्रायव्हर पुण्याच्या आरटीओ कार्यालयात कामासाठीही गेला होता. त्यावेळी हा ड्रायव्हर कार्यालयाची तीन क्लर्कच्या संपर्कात आला होता. या तिन्ही क्लर्कना आता तपासणीसाठी नायडू रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना संशयित महिला आढळली
पिंपरी-चिंचवडमध्येही कोरोना व्हायरसची संशयित महिला रुग्ण आढळली आहे. संबंधित महिला 27 फेब्रुवारीला दुबईतून भारतात परतली होती. त्यानंतर कालपासून तिच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येत होती, तिला याचा त्रासही होऊ लागला होता. त्यानंतर तातडीने खबरदारी म्हणून महिलेला पुण्याच्या नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या महिलेसह तिच्या कुटुंबातील आठ व्यक्तींनाही नायडू रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर या सर्वांना कोरोनाही लागण झाली आहे का, हे स्पष्ट होईल. संबंधित महिला 21 फेब्रुवारीला दुबईत गेली होती. त्यानंतर भारतात परतल्यानंतर ती कुणाकुणाला भेटली याचीही माहिती आता घेतली जात आहे.
Coronavirus | राज्यात कोरोनाचे पाच रुग्ण, मुंबईत एकही रुग्ण आढळलेला नाही : राजेश टोपे
मुंबईत कोरोनाचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. गेल्या काही दिवसात परदेशी जे नागरिक गेले होते, त्यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांच्या सर्वांच्या तपासण्या सुरु आहेत. तसेच कोरोनाबाबत पाच सदस्यीय समिती स्थापन करणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. एकट्या सार्वजनिक आरोग्य खात्यावर ताण येऊ नये म्हणून गृह खातं, महसूल, वैद्यकीय, शिक्षण खात्याचे अधिकारी एकत्र काम करतील, असं टोपे यांनी सांगितलं. कोरोनाबाबत अनेक अफवा देखील सोशल मीडिया किंवा इतर माध्यमातून पसवल्या जात आहेत. या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नका, घाबरून जाऊ नका, असं आवाहनही राजेश टोपे यांनी केलं आहे.
Coronavirus Outbreak | पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला कोरोनाची लागण