मुंबई : कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात एन्ट्री केल्याची माहिती स्पष्ट झाल्यानंतर आता सरकार, प्रशासनासह नागरिक देखील दक्ष झाले आहेत. कोरोनाच्या धसक्याने राज्यातील अनेक देवाधिकांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच अनेक कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत. तर मुंबईत सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनावर देखील कोरोना इफेक्ट जाणवला. कोरोनाच्या भीतीने विधिमंडळात अनावश्यक प्रवेश बंदी करण्यात आली. आज विधिमंडळात एक दिवसाच्या पासेसवर बंदीचे निर्देश देण्यात आले आहेत.

येरमाळ्याची प्रसिद्ध येडेश्वरी यात्रा रद्द
उस्मानाबाद : कोरोनाच्या धसक्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळ्याची येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासन, मंदिर प्रशासन, पुजारी आणि गावकरी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तुळजापूरच्या तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून येडेश्वरी देवीला मान आहे. तुळजाभवानीचे दर्शन घेऊन भाविक या यात्रेला हजेरी लावतात. यात्रेसाठी 10 ते 15 लाख भाविक हजेरी लावतात. येडेश्वरी देवीचा चुना वेचण्याचा मुख्य कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला आहे. देवीची पालखी डोंगरावरच राहणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. या काळात धार्मिक विधी लाईव्ह दाखवणार असल्याचे आयोजकांनी सांगितलं आहे. भाविकांनी चुना वेचण्यासाठी येऊ नये असे आवाहन प्रशासन, ग्रामपंचायत, मंदिर संस्थानाकडून करण्यात आले आहे.

Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्त दाम्पत्यांसोबतच्या पर्यटकांची माहिती; तुमच्या शहरात किती जण? पाहा

इजतेमा आणि मांगीर बाबाची यात्रा रद्द
औरंगाबाद : पैठण रोड चितेगावमध्ये होणारी इजतेमा आणि मांगीर बाबाची यात्रा रद्द करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 27 ,28 आणि 29 तारखेला ही यात्रा होणार आहे. या इजतेमासाठी आखाती देशातील लोक येणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे यात्रा रद्द करणार असल्याची माहिती औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. तर 9 एप्रिल पासून होणारी मांगीर बाबा यात्राही रद्द करणार असल्याचे सांगितले आहे. लवकरच दोनही संयोजकांशी बोलणार असल्याचे प्रभारी जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितलं आहे.

 तुकाराम बीज सोहळ्यावर कोरोनाचं सावट 

पुणे जिल्ह्यातील देहूमध्ये होणाऱ्या तुकाराम बीज सोहळ्यावर कोरोनाचं सावट पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या भीतीनं वारकऱ्यांनी तुकाराम बीज सोहळ्याकडे पाठ फिरवल्यानं वारकऱ्यांच्या संख्येत 25 टक्क्यांनी घट झाल्याची माहिती आहे. पुण्यातील देहू या ठिकाणी दरवर्षी तुकाराम बीज मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. राज्यभरातून लाखो वारकरी या ठिकाणी येत असतात.

शिखर शिंगणापूरच्या यात्रेनिमित्ताने जमावबंदीचा आदेश
शिखर शिंगणापूरच्या यात्रेनिमित्ताने जमावबंदीचा आदेश देण्यात आला आहे. 25 मार्च ते 7 एप्रिलपर्यंत जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस प्रमुखांनी हे आदेश दिले आहेत. शंभुमहादेवाच्या यात्रेनिमित्ताने मुंबई पोलिस अधिनियम 36 कलम लागू करण्यात आले आहे. लोकांचे स्वास्थ सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा उल्लेख टाळत पोलिसांनी हे कलम लागू केले आहे.

नाथ षष्ठी दरम्यान दुकान थाटण्याची परवानगी नाकारली
बीड : नाथ षष्ठी रद्द करण्याच्या निर्णयानंतर नगरपालिकेने नाथ षष्ठी दरम्यान दुकान थाटण्याची परवानगी नाकारली आहे. शासकीय जमिनीवरती राहुट्या ठोकू देणार नसल्याचे सांगण्यात आलं आहे. रहाट पाळण्यांसह इतर यात्रेचं साहित्यही लावण्यास नगरपालिकेने परवानगी दिलेली नाही. आलेल्या वारकऱ्यांना दर्शन घेऊन परत जाण्याची नगरपालिकेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे.

Coronavirus | कोरोनाबद्दल हे माहित असायलाच हवं!

औरंगाबाद महापालिका निवडणूक पुढे ढकला, एमआयएम पाठोपाठ शिवसेनेची मागणी
औरंगाबाद : महापालिका निवडणूक पुढे ढकला अशी मागणी एमआयएम पाठोपाठ शिवसेनेची मागणी आहे. औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडले यांनी निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महापौर घोडले यांनी औरंगाबाद महापालिकेला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्याचीही मागणी केली आहे.

कोरोनाच्या भीतीने विधिमंडळात अनावश्यक प्रवेश बंदी

विधिमंडळात सुरु असलेल्या अधिवेशनावर देखील कोरोनाचे पडसाद उमटले आहेत. आज विधिमंडळात एक दिवसासाठीच्या पासेसवर बंदीचे निर्देश दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष, सभापती किंवा मुख्यमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कुणालाही पासेसचे वाटप न करण्याच्या प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. विधी मंडळात सध्या मोठ्या प्रमाणावर लोक आपल्या कामासाठी येतात.

अधिवेशन हे आधी ठरल्यानुसार 20 मार्च पर्यंत चालणार
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत सध्या तरी बदल होणार नाही, अशी माहिती मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशनाचा कालावधी कमी होणार असल्याची चर्चा होती. विधिमंडळ अधिवेशन हे आधी ठरल्यानुसार 20 मार्चपर्यंत चालणार आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे अधिवेशन गुंडाळलं जाणार नाही, अशी घोषणा मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत केली.

मिरजमध्ये दरवर्षी मुस्लीम बांधवांचा उरूस भरतो. भारतभरातून हजारो मुस्लीम बांधव या उरूसात सामील होतात. हा उरूसही पुढे ढकलावा किंवा यावेळी रद्द करावा असा पर्याय प्रशासनाने दिल्याचं कळतं. अर्थात याला अधिकृत दुजोरा नाही. कोरोना संबंधात ज्या सार्वजनिक कार्यक्रमांच्या बैठका घेतल्या गेल्या त्यात हे विचार मांडण्यात आले आहेत. उरूसाबाबतही अद्याप निर्णय झालेला नाही.

अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनही पुढे?

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव लक्षात घेता एकीकडे मुख्यमंत्री आयपीएलपासून अनेक कार्यक्रमांचा आढावा घेत आहेत. त्याचवेळी दुसरीकडे या व्हायरसचा ताण सांगलीत होणाऱ्या 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनावरही आला आहे. अर्थात याबद्दल कोणतीही अधिकृत सूचना वजा आदेश मध्यवर्ती शाखेला मिळालेले नाहीत.


Corona Virus | कोरोनातून बऱ्या झालेल्या महिलेच्या अनुभवाची पोस्ट व्हायरल


Coronavirus | कोरोनाच्या भीतीने औरंगाबादमधील शिवजयंतीच्या कार्यक्रमांना परवानगी नाही