नवी मुंबईतील कोरोनबाधितांचा आकडा 145 वर, एकाच घरातील 14 जणांना कोरोनाची लागण
नवी मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या रविवारी 23 तर सोमवारी 14 ने वाढल्याने नवी मुंबई मनपा आणि पोलीस प्रशासनही हादरले आहे. सध्या शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या 145 झाली आहे. गेल्या दोन दिवसात वाढलेल्या संख्येमध्ये एकाच घरातील 14 जणांचा समावेश आहे.
नवी मुंबई : नवी मुंबईकरांच्या चिंतेत भर घालणाऱ्या घटना गेल्या दोन दिवसापासून समोर आल्या आहेत. दोन दिवसात तब्बल 37 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडल्याने मनपा प्रशासनही हादरले आहे. यात एकाच घरातील 14 सदस्यांना कोरोनाचा लागण झाली असून यात एक महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे. मुंबई येथील रूग्णालयात कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या घरातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने अत्यावश्यक विभागात काम करणाऱ्या व्यक्तींची संबंधित ठिकाणी राहण्याची सोय करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. सीवूडमध्ये ही बाब समोर आल्याने सीवूड सेक्टर 50 परिसर पूर्णपणे सील केला आहे. दरम्यान नवी मुंबई शहराची कोरोना पॉझिटिव्ह संख्या 150 च्या घरात गेल्याने शहरासाठी ही चिंताजनक बाब आहे.
गेल्या दीड महिन्यापासून संथ गतीने वाढणारी शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या दोन दिवसात वाढली आहे. रविवारी 23 तर सोमवारी 14 ने संख्या वाढल्याने नवी मुंबईतील मनपा आणि पोलीस प्रशासनही हादरले आहे. सध्या शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या 145 झाली असून याच गतीने वाढू लागल्यास लवकरच ती 200 चा टप्पा पार करण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसात वाढलेल्या संख्येमध्ये एकाच घरातील 14 लोकांची यात भर पडली आहे. यामध्ये एका महिन्याच्या बाळालाही कोरोनाची बाधा झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सध्या या 14 लोकांवर वाशीतील मनपा रूग्णालय आणि फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
शहरात कम्युनिटी संसर्ग झाला नसला तरी मुंबईतून नवी मुंबईत प्रवास करणारे डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, पोलीस, मीडियाकर्मी यांना कोरोनाने गाठल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यांच्या संपर्कात आलेल्या घरातील सदस्यांना, नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये कोरोना पसरत असल्याने शहरातील कोरोना पॉझिटिव्ह संख्या अचानक वाढली आहे.
नवी मुंबतील कोरोना रेड झोन म्हणून वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे, ऐरोली यांचा समावेश आहे. या विभागातील तब्बल 39 ठिकाणे मनपाने कन्टेनमेन्ट झोन म्हणून घोषित केले आहेत. या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून रस्ते सील करण्यात आले असून ज्या सोसासाटींमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत, त्यांना बाहेर निघण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. कोरोना रेड झोन म्हणून समोर येत असलेल्या प्रत्येक विभागात मनपाकडून सॅनिटायझिंग केले जात असून तेथील व्यक्तींच्या तपासण्या जलद गतीने केल्या जात असल्याचे मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.
औद्योगिक वसाहतींमधील बँकींग क्षेत्राशी निगडीत असलेल्या आयटी कंपनीतील 19 कामगार कोरोना पॉझिटिव्ह आल्याने सध्या कंपन्या सुरू करण्यासाठी मालक धजावत आहेत. त्यांची राहण्याची आणि ने-आण करण्याची सोय नीट होत नाही, तोपर्यंत ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील कंपण्या सुरू होण्याची शक्यता सद्या तरी धुसर आहे. शहरातील वाढते कोरोना रूग्ण पाहता सरसकट कंपन्या सुरू करण्यासाठी मनपा आणि पोलीस प्रशासनाकडूनही त्वरित हिरवा कंदील मिळण्याची शक्यता कमी आहे.
नवी मुंबईतील कोरोना रुग्णाचा तपशील
- कोरोनाची चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या - 2123
- पॉझिटिव्ह रूग्ण - 145
- निगेटिव्ह - 1487
- तपासणी अहवाल प्रलंबित - 491
- अहवाल पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह (कोरोनामुक्त) - 27
- वाशी, सेक्टर - 14 , कोव्हीड केअर सेंटर येथील नागरिक संख्या - 47
- इंडिया बुल्स, पनवेल, कोव्हीड केअर सेंटर नागरिक संख्या - 394
- घरी क्वॉरंटाईन असलेल्या व्यक्तींची संख्या - 3452
- क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण केलेली संख्या - 2463
- कोरोनामुळे मृत्यू झालेली संख्या - 5
- कन्टेनमेन्ट क्षेत्र - 39
संबंधित बातम्या
- PM Modi | 3 मे चा दुसरा लॉकडाऊन संपल्यानंतर काय? पंतप्रधानांकडून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना महत्वाच्या सूचना
- PM Modi | कोरोना दीर्घ काळासाठी आपल्यात राहणार हे समजून धोरणं ठरवा : पंतप्रधान मोदी
- कोरोनाच्या रॅपिड टेस्ट किटमध्ये नफेखोरी, नफेखोरी करणाऱ्या कंपनीला कोर्टानं फटकारलं