(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CNG & PNG Price Hike Mumbai: मुंबईकरांना मोठा फटका; आजपासून सीएनजी आणि पाईप गॅस महागला
पट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. अशातच सीएनजी आणि पाईप गॅस महागल्यामुळे सर्व सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे.
मुंबई : इंधन दरवाढीला पर्याय म्हणून हल्ली ब्रँडेड चारचाकी वाहनांमध्येही सीएनजी बसवण्यात येतो. पण आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आजपासून वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ आता सीएनजी गॅसच्या किमतीत आजपासून वाढ होणार आहे.
महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने आज मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रती किलो 2 रुपये 58 पैशांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. याचा मुंबईकरांना मोठा फटका बसला आहे.
वाहतूक आणि अन्य खर्चात वाढ झाल्याने ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महानगर गॅसकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते. या दरवाढीने मुंबईतील रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट 55 पैसे वाढ करण्यात येणार आहे.
आजपासून सीएनजी आणि पाईप गॅसचे दर कसे असणार ?
- सीएनजीचा भाव एक किलोसाठी 51.98 रुपये इतका वाढणार आहे.
- पाईप गॅससाठी ग्राहकांसाठी प्रती युनिट 55 पैसे वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार स्लॅब-1 साठी 30.40 रुपये प्रती युनिट आणि स्लॅब-3 साठी 36 रुपये प्रती युनिट दर असेल, असे कंपनीने म्हटलं आहे.
- व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरची किंमत 84 रुपयांनी वाढली होती.
पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी सिलिंडरच्या तुलनेत सीएनजी स्वस्त
सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुलनेत सीएनजीचे दर स्वस्त आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 107.20 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 97.21 रुपये आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 67 टक्क्यांनी स्वस्त आहे. तर डिझेलच्या तुलनेत सीएनजी 47 टक्क्यांनी स्वस्त आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या सीएनजी पाईप गॅस 35 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कंपनीने म्हटलं आहे.
पट्रोल आणि डिझेलच्या किंमती दररोज वाढत आहेत. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली असून डिझेलचे दरही शंभरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे इंधन दरवाढीनंतर सीएनजी दरवाढीनंही सर्वसामान्यांचा खिसा हलका होणार आहे.
इंधन दरवाढीबाबत सरकारने आधीच हात वर केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतीमुळे होत असल्याचं सरकारनं स्पष्ट केलं आहे.