(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Shinde : 'मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
Maratha Reservation : मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार ठाकरेंना नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला.
मुंबई : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरेच असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रत्युत्तर दिलं. मराठा समाजाबद्दल (Maratha Reservation) त्यांना किती संवेदना आहेत, हे त्यांनाही माहित आहे आणि मराठा समाजालाही असं देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटलं. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण न टिकण्यासाठी ठाकरेच जबाबदार असल्याचं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत.
दरम्यान उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार का? असा संतप्त सवाल सरकारला केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा सध्या राज्यात चांगलाच पेटला आहे. राज्यात अनेक ठिकाणी हे आंदोलन अधिक आक्रमक होत चालल्याचं पाहायला मिळतय. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील आता ऐरणीवर आलाय.
मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार ठाकरेंना नाही - मुख्यमंत्री शिंदे
'आम्ही करु शकलो नाही, पण हे करत आहेत म्हणून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मराठा आरक्षणावर बोलण्याचा ठाकरेंना नैतिक अधिकार नाही. ज्या काळामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं. उच्च न्यायालयामध्ये त्या आरक्षणाला चॅलेंज देण्यात आलं, तिथेही ते आरक्षण टिकलं. ते टिकवण्याचं काम मी आणि देवेंद्र फडणवीसांनी केलं. पण दुर्दैवाने सर्वोच्च न्यायालायमध्ये ते टिकलं नाही. तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी ते टिकवलं नाही', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.
टोकाचं पाऊल उचलू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन
टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लावू नका असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला केलं आहे. सध्या राज्यात मराठा आंदोलक चांगेलच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतयं. त्यातच अनेक ठिकाणी जाळपोळीच्या देखील घटना घडल्या.
तसेच मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास कटिबद्ध असल्याचं देखील यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. सध्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्यात एकच खळबळ माजलीये. तर उपोषणामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती दिवसागणिक खालावत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकरावर दबाब निर्माण होत आहे. तर आरक्षणासाठी सरकारकडून देखील हालचालींना वेग आला आहे. त्यातच राज्यात विशेष अधिवेशन घेण्याची मागणी देखील जोर धरु लागलीये. त्यामुळे आता सरकार विशेष अधिवेशन बोलावणार हे पाहणं गरजेचं ठरेल.