Justice S. kathawala : मुंबई उच्च न्यायालयात सुट्टीकाळातही मॅरेथॉन कामकाज; सकाळी 10.45 ला सुरु झालेलं काम रात्री सव्वाअकराला थांबलं
मुंबई उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या अध्यक्षतेखाली कोर्टानं बुधवारी सलग साडेबारा तास कामकाज केलं. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं सकाळी 10:45 ला सुरु केलेलं कामकाज रात्री 11:15 ला संपवलं. ज्यात त्यांनी तब्बल 80 प्रकरणांवर सुनावणी घेतली.

मुंबई : बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीकाळात न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं मॅरेथॉन कामकाज केलं आहे. न्यायमूर्ती शाहरूख काथावाला हे जास्तीत जास्त वेळ न्यायालयीन सुनावणीचे काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बुधवारी न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी सुरु केलेलं ऑनलाईन कामकाज रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी संपवलं. पूर्वीपासूनच मॅरेथॉन कामकाजासाठी प्रसिद्ध असलेले न्यायमूर्ती शाहरूख काथावाला उन्हाळी सुट्टीतरी रेकर्डब्रेक सुनावणी केल्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.
कोरोना महामारीमुळे उच्च न्यायालयाच्या सुनावण्यांवरही निर्बंध आले आहेत. केवळ तातडीच्या आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी दिले आहेत. अशातच आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु आहेत. सुट्टीच्या काळात तातडीच्या प्रकरणांवरील सुनावणीसाठी मुख्य न्यायमूर्तींनी ठराविक न्यायालयं निश्चित केली आहेत. अशातच सध्या सुरु असलेल्या संपूर्ण आठवड्यासाठी न्यायमूर्ती काथावाला आणि न्यायमूर्ती तावडे यांच्या खंडपीठाचाही समावेश आहे. त्यानुसार, खंडपीठाने बुधवारच्या दिवसासाठी 80 प्रकरणे सुनावणीसाठी ठेवली होती.
न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती सुरेंद्र तावडे यांच्या खंडपीठानं सुनावणी केलेल्या प्रकरणांमध्ये अनेक महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश होता. कोस्टल रोड प्रकल्पात अडथळा ठरणाऱ्या झाडांवरील तोडकामाची कारवाई, दहावीच्या परीक्षेचा प्रश्न, तर कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणातील आरोपी स्टॅन स्वामी व हनी बाबू यांचे अंतरिम जामिनाचे अर्ज अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रकरणांचा समावेश होता. तसेच सर्वात शेवटी न्यायालयानं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने केलेल्या एफआयआरमधील राज्य सरकारबाबत असलेल्या आक्षेपार्ह भागाविषयी राज्य सरकारने केलेल्या याचिकेवरील सुनावणी कोर्टानं घेतली. पण ती अपूर्ण राहिली. अखेर रात्री 11 वाजून 15 मिनिटांनी ऑनलाईन कामकाज थांबलं.
दरम्यान, कामाच्या ठरलेल्या तासांव्यतिरिक्त न्यायमूर्ती काथावाला यांनी पहिल्यांदाच काम केलेलं नाही. यापूर्वीही जास्तीत जास्त वेळ न्यायालयीन सुनावणीचे काम केल्यामुळे न्यायमूर्ती काथावाला चर्चेत आले होते. मे 2018 मध्ये, सुट्टीच्या एक दिवस आधी, न्यायमूर्ती काथावाला यांनी एकमेव न्यायमूर्ती म्हणून कोणताही ब्रेक न घेता एकाच दिवशी तब्बल 120 प्रकरणांवर सुनावणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
