(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सुबोध जयस्वालांच्या CBI संचालकपदावरील नियुक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली
Subodh Jaiswal: सुबोध जयस्वालांच्या CBI संचालकपदावरील नियुक्तीला आव्हान देणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रमुख पदी नियुक्ती झाल्यास पुन्हा आव्हान देण्याची याचिकाकर्त्यांना मुभा
Bombay HC Dismisses PIL Challenging CBI Director Appointment: सीबीआय (CBI) संचालकपदी सुबोध जयस्वाल (Subodh Jaiswal) यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केलेली नियुक्ती योग्य आणि कायदेशीर असल्याचा दावा करत या नियुक्तीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्याची विनंती केंद्र सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ही याचिका गुणवत्तेच्या आधारावर ऐकण्यास अयोग्य असल्याचे सांगत ती फेटाळून लावण्याची विनंती केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्रातून केली होती. तसेच जयस्वाल यांचा कार्यकाळ मे महिन्यातच संपुष्टात आल्यानं या याचिकेला आता काही अर्थ नाही, असंही हायकोर्टाला सांगण्यात आलं. याची नोंद घेत मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावली. मात्र सुबोध जयस्वाल यांची लवकरच केंद्रीय लोकासेवा आयोगाच्या प्रमुख पदावर नियुक्ती होण्याची चर्चा असल्यानं ती झाल्यास पुन्हा कोर्टात येण्याची मुभा याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे.
काय आहे याचिका?
मुंबई पोलीस दलातील निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्रकुमार त्रिवेदी यांनी जयस्वाल यांच्याविरोधात ही रीट याचिका दाखल केली होती. जयस्वाल यांना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणाचा तपास करण्याचा कोणताही अनुभव नसून त्यांची विश्वासार्हताच संशयास्पद असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी या याचिकेतून केला होता. तेलगी मुद्रांक घोटाळ्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या विशेष तपास समितीचे नेतृत्व जयस्वालच करत होते. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचाही समावेश होता. मात्र, या टीमवर अनेक आरोप करण्यात आले आणि त्यानंतर घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आला.
जयस्वाल आपल्या पदाचा गैरवापर करत होते. त्याविरोधात आवाज उठविल्याबद्दल आपली गैरसोयीच्या ठिकाणी बदली केली गेली होती. त्यानंतर महाराष्ट्र प्रशासकीय प्रधिकरणाने (मॅट) ती बदली रद्द केली असल्याचा आरोपही त्रिवेदी यांनी आपल्या याचिकेतून केला होता. तर दुसरीकडे, साल 2019 ते 2020 या काळात गृहमंत्री अनिल देशमुख तर सुबोध जयस्वाल हे महाराष्ट्र पोलीस महासंचालक असताना केलेल्या बदल्या आणि पदोन्नतीच्या शिफारशी जयस्वाल यांनीच मंजूर केल्या होत्या. ज्याची सीबीआय चौकशी सुरू आहे, आणि आता तेच सुबोध जयस्वाल सीबीआय संचालक आहेत. त्यामुळे सीबीआय त्या गैरव्यवहारांची निष्पक्ष चौकशी कशी करू शकते?, असा सवालही या याचिकेतून उपस्थित करण्यात आला होता.
मात्र केंद्र सरकारकडून संजय कुमार चौरसिया यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करत याचिकेत उपस्थित केलेले मुद्दे गुणवत्तेवर आधारित नसून कालपनिक गृहितकांवर आधारीत असल्याचं स्पष्ट केलं. नियुक्ती करणार्या समितीने ज्येष्ठता, सचोटी, तपासातील अनुभव आणि भ्रष्टाचारविरोधातील कामावर आधारित सर्व संबंधित घटकांचा विचार करून सीबीआयच्या संचालक पदासाठी ज्येष्ठतेनुसार जयस्वाल यांच्या नावाची या पदासाठी शिफारस केली आहे. जयस्वाल यांच्याविरोधात त्रिवेदी यांनी दाखल केलेली रिट याचिका अथवा तक्रारीची कोणतीही माहिती गृह मंत्रालय किंवा राज्य सरकारच्या रेकॉर्डवर उपलब्ध नाही. तसेच केंद्रात महासंचालक म्हणून नियुक्तीदरम्यान राज्य सरकारने जयस्वालांच्या विरोधात तक्रार किंवा न्यायालयीन खटला प्रलंबित नाही, असंही नमूद केल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे.
इतर आरोपांचंही केलंय खंडन
एखाद्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 अंतर्गत गुन्ह्यांची नोंद करण्याचा आणि तपास करण्याचा अधिकार असून तो कर्तव्याचा भाग आहे. भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांची चौकशी किंवा देखरेख करण्यासाठी नियम आणि प्रक्रिया आवश्यक असते. जयस्वाल हे तीन जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक होते. मुंबईचे पोलीस आयुक्त आणि महाराष्ट्राचे डीजीपीही होते. भ्रष्टाचारविरोधी प्रकरणे केवळ भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 पुरती मर्यादित नसून त्यात आर्थिक गुन्हे, व्हाईट कॉलर गुन्हे, कॉर्पोरेट गुन्हे, दक्षता प्रकरणे इत्यादींचाही समावेश होते. त्यामुळे, जयस्वाल यांना भ्रष्टाचारविरोधी प्रकरणांचा तपास आणि देखरेख करण्याचा कोणताही अनुभव नसल्याचा दावा चुकीचा असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटलेलं आहे.